ऐसे कैसे झाले भोंदू l कर्म करोनी म्हणती साधू ll

SHARE:

तुका म्हणे, शोभा सांगे…

  संत तुकाराम महाराज या अभंगातून खोट्या आणि ढोंगी माणसाविषयी तीव्र संताप व्यक्त करतात. हा अभंग म्हणजे भोंदूंच्या कर्मावर म्हणजेच पर्यायाने अंधश्रद्धेवर प्रखरपणे चढविलेला हल्लाच होय. या घणाघाती शाब्दिक प्रहारातून तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेवर प्रखरपणे केलेली सडेतोड टीका आहे. त्याकाळी अशाप्रकारे अंधश्रद्धेवर उघडपणे आणि कटूपणाने बोलणारे तुकाराम महाराज हे पहिलेच संत आहेत.

त्याकाळी ढोंगी साधू अंगाला राख फासून किंवा वैराग्याचा आव आणून वरवर साधू असल्याचा देखावा करत होते.पण प्रत्यक्षात साधू पणाच्या आडून वाईट कर्म आणि पाप करत होते. हेच साधू लोक वरकरणी विरक्त असल्याचे दाखवून विषय सुखाचा मनसोक्त आनंद लुटत होते.
“दावुनी वैराग्याची कळा l भोगी विषयाचा सोहळा ll” 
असे ढोंग करणारे साधू समाजाची दिशाभूल करून समाजात अंधश्रद्धा पसरविण्यास कारणीभूत ठरत होते. त्यामुळे अशांची संगती धरू नका, त्यांचा सहवास पण नको असा तीव्र संताप तुकारामांनी व्यक्त केला आहे..

संत बहिणाबाईंनी “तुका झालासे कळस” असे वारकरी संप्रदायाच्या बाबतीत म्हटले असले तरी संत तुकाराम  त्याकाळी समाजात फोफावत चाललेल्या अंधश्रद्धेच्या विरोधातही बोलणारे पहिलेच संत ठरतात. ते अनेकदा “मेणाहुनही मऊ आम्ही विष्णुदास” असे म्हणतात. पण समाजातील अंधश्रद्धे विषयी अत्यंत कठोर होऊन आणि परखडपणे आपले विचार मांडतात. परिस्थितीने लाचार होणारे, एकवेळ भोंदूंच्या आहारी गेल्याचे समजू शकतो. पण सधन, समजदार, असेही लोक बुवांना, भोदुना शरण जाऊन त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. स्वतःची फसवणूक होते हे त्यांना कळत नाही. मुले होत नाहीत म्हणून भोंदूनी सांगितलेले उपाय करतात, नवस बोलतात, अघोरी उपाय करतात. कोंबडे, बकरे अशा निष्पाप जीवांचा बळी देतात. याला वारकरी संप्रदायातील वारकरी, भक्त अपवाद नाहीत.
“नवसे कन्या पुत्र होती l
तरी का करणे लगे पती ll” 
अशा जिव्हारी लागणाऱ्या शब्दात ते निर्भर्त्सना देखील करतात.

संत तुकारामांनी समाजातील ढोंगीपणा, बुवाबाजी, अंधश्रद्धा यावर आपल्या अभंगातून टीका केली आहे. यंत्र, मंत्र, चमत्कार, नव सायास, भोंदूगिरी यासारख्या समाजविघातक प्रथांवर लोक जागृती केली. समाज प्रवाहाच्या विरोधात जाऊन अशा प्रकारची जनजागृती सोपी नव्हती. प्रतिकूल परिस्थितीत तुकोबांनी ही बहुमोल कामगिरी केली. म्हणून तुकोबा “अंधश्रद्धा निर्मूलनाचे” खरे जनक ठरतात. त्याकाळी अभंग आणि कीर्तन ही समाजप्रबोधनाची  खरी साधने होती. तुकारामांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. अंधश्रध्देविरुद्द समाजप्रबोधनाची धुरा निष्ठेने आपल्या हयातीत चालविली.

तुकोबांनी समाजाला फसवणाऱ्या लबाड, संन्यासी, व ढोंगी, साधूंपासून दूर राहण्याचा संदेश दिला. बाह्य आचार आणि वेशभूषेपेक्षा अंतःकरणाची शुद्धता व खरी भक्ती महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
“यंत्र, मंत्र, काय करिसी जडीबुटी l
तेणे भूत सृष्टी पावशील ll” 
असे यंत्र, मंत्र च्या सहाय्याने, खरे सुख, समृद्धी प्राप्त होईल अशा चमत्कारांची अपेक्षा करणाऱ्या मानसिकतेचा त्यांनी नेहमीच निषेध केला आहे.

मानवी अज्ञानाचा गैरफायदा खोट्या जडीबुटीच्या रुपातील निरुपयोगी औषधपाणी देणे किंवा जादूटोणा करून कोणतेही प्रश्न सुटत नाही. हे त्यांनी लोकांना अनेक दृष्टांत देऊन, कानीकपाळी ओरडून सांगितले. चमत्काराने कोणताही प्रश्न सुटत नाही. हा समज त्यांनी फेटाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

   “सेंदरा दैवताना नवस सायास,
करू जाती नाश आत्म याचा |” 
अंध श्रद्धे पोटी केले जाणारे नवस, पशु बळी किंवा विविध विधी यांना तुकारामांनी कधीच मान्यता दिली नाही. कारण त्यांच्या मते खरी भक्ती ही मनाच्या निर्मळतेवर आणि ईश्वरावरील निखळ प्रेमावर अवलंबून असते. कष्ट केल्याशिवाय देव कधीही मिळत नाही. अंगाला राख फासून किंवा गोसावी होऊन वरवरचा आव आणणाऱ्याकडे देव नसतो. कारण त्यांच्या मनात दांभिकपणा भरलेला असतो. संत तुकाराम हेच सांगतात की, नेहमी सत्याचा मार्ग अवलंबावा आणि असत्य व भोंदू कर्म सोडून द्यावे.

संत तुकाराम हे वैज्ञानिक व विवेक वादी द्रृष्टीकोन बाळगणारे द्रष्टेविचारवंत होते. माणसाने प्रत्येक गोष्टीत तारतम्य बाळगावे, कार्यकारणभाव पहावा आणि आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नये. असा वैज्ञानिक व विवेक वादी द्रृष्टीकोन ठेवून त्यांनी विचार मांडला.

 

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड 
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत वांड्मयाचे अभ्यासक, अमरावती.

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा