‘भाषा’
हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘भाषा’ ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर शैक्षणिक, सांस्कृतिक वहनाचे ती माध्यम आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात स्वदेश आणि स्वधर्म यांना जे महत्त्व आहे, तेच पर्यायाने मातृभाषेला आहे. मातृभाषेच्या अभ्यासाने शिक्षणाचा पाया घातला जातो.
मातृभाषा ही बालकांच्या शैक्षणिक प्रगतीचा आधार व परस्परांशी व्यवहार करण्याचे योग्य व परिणामकारक माध्यम आहे. मातृभाषेमुळे विद्यार्थी ज्या नैसर्गिक व सामाजिक वातावरणात राहतो, त्या संबंधीच्या ज्ञानाचे क्षेत्र विस्तारीत होते.
भाषेचा व्यवहार
हा बोलून किंवा लिहून होतो. व्यक्ती जे बोलते वा लिहिते ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक व शुद्ध असेल तरच तिचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडतो.
बालशिक्षणाचे वय हे मुलांचे सहा वर्षापर्यंतचे वय, मानले जाते. त्यापैकी पहिली ३ वर्ष मुलांचे पोषण, संगोपन, संरक्षण आणि शिक्षण घरच्या घरीच होते. बालकाचे कुटुंब व नजिकच्या आजूबाजूचा समाजगट हे शिक्षण घडवून आणत असतो. हे शिक्षण दोन प्रकारचे असते.
1) बालकांच्या उपजत क्षमतांच्या आधारे होणारे शिक्षण.
2)आजुबाजूच्या वातावरणातील मानवनिर्मित घटकांकडून होणारे शिक्षण.
बालपणात प्रखरपणे ज्ञानसंपादनासाठी अनुभवाचे स्थान फार मोठे आहे. कृतीशील अनुभवातून मुलांची आकलन शक्ती अधिक विकसित होते. बालकाच्या मेंदूमध्ये विविध क्षमतांची विविध केंद्रे असतात. ही केंद्र सतत उत्तेजित ठेवण्याकरता अगदी बालपणापासून-च बालकाला नवीन- नवीन अनुभव देण्याची आवश्यकता आहे. हे अनुभव प्रभावीपणे दिले गेल्यास त्या क्षमता अधिक विकसित होतात. अन्यथा त्या विनाश पावतात. ह्या क्षमता अधिक प्रभावीपणे आपण मातृभाषेचा वापर करूनच बालकामध्ये विकसित करू शकू. मेदूमधील वेगवेगळी केंद्रे आणि त्या केंद्रात असलेली मज्जातंतूंची जाळी ही स्वतंत्रपणे कार्यान्वित असतात. त्यातून वेगवेगळ्या बुद्धीमत्तांची व क्षमतांची कार्य चालू राहतात.
आज आपण बघतो आहोत की आपल्या बहुतांश पालकांची मातृभाषा मराठी आहे. परंतु आज पालकांमध्ये आपल्य आपल्या मुलांना कॉन्हेंट्समध्ये टाकून त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा इंग्रजी भाषेतून करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. बालक, पालक व शिक्षक सगळा समाजच इंग्रजी माध्यमाच्या वेडाने झपाटला आहे.
‘इंग्रजी’ ही आपली मातृभाषा नाही. मग इंग्रजी माध्यमातून शिकताना मुलांना धड समजतच नाही. इंग्रजी माध्यमामूळे मुलाच्या आकलन, विचार व अभिव्यक्ती या प्रक्रियेला मर्यादा पडतात आणि या सर्वांचा त्यांच्या अध्ययन क्षमतेवर, वैचारिक व बौद्धिक विकासावर परिणाम होतो. जोप्रश्न विचारू शकत नाहीत. बालपणी मातृभाषेतून शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमता, संकल्पना अधिक दृढ झाल्यामुळे पुढे प्राविण्य मिळवणे अधिक सोपे होते.
‘माता तशी स्वभाषा, सेवाया होय आपणा उचीत किंबहुना मातेहुनी अधिक ही ची योग्य असे खचित, दे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी चकळ मातेशिवाय जन्म ही जाय, न भाषेशिवाय एकपळ.’
कवि ग. रा. मोगरे यांच्या कवितेतील वरील पंक्ती मातृभाषेचे मानवी जीवनातील महत्व स्पष्ट करतात. कोणतीही व्यक्ती मातृभाषेशिवाय जीवन जगूच शकत नाही. मनुष्य हा केवळ मातृभाषेतूनच विचार व चिंतन करू शकतो अन्य कोणत्याही भाषेत तो विचार करू शकत नाही.
मातृभाषेतून जेज्ञान संपादन करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी लागतो, तेच ज्ञान परकीय भाषेमधून संपादन करायला तीन महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळांतून मराठी मातृभाषेतून शिक्षण देण्याची योजना आखली होती. जगामधील सर्वच प्रगत राष्ट्रांचा विकास हा ‘मातृभाषेतूनच शिक्षण’ या पायाभूत धोरणामुळे झालेला आहे. भाषा ही औपचारिक शिकणाची नव्हे तर सहज शिक्षणाची प्रक्रिया आहे.
ज्ञानेश्वरांच्या काळात बहुजन समाजाला संस्कृत भाषा अवगत नसल्यामुळे ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील झान-संपदेला मराठी भाषेत, लोकभाषेत आणून लोकांना ज्ञानप्राप्तीचा मार्ग खुला करून दिला. ज्ञानेश्वरांच्या काळात मराठी भाषेचे सामर्थ्य, सौदर्य व वैभव संत ज्ञानेश्वरांनी वाढविले. आज आवश्यकता आहे ती ज्ञानेश्वरांच्या भाषाभिमानाची, आत्मविश्वासाची व प्रतिभेची.
विनोबांचा देखील भाषेचा अभ्यास थक्क करणारा आहे. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या १५ ही भाषा विनोबांना अवगत होत्या. तरीही इयत्ता आठवी पर्यंत प्राथमिक स्तरावर केवळ मातृभाषांच शिकवावी असे विनोबा म्हणतात. एकच भाषा असल्याने विदयार्थी मातृभाषेचा अभ्यास योग्य रितीने करतील. मातृभाषेचा संबंध व्यक्तीच्या जीवनाशी येत असल्याने तिचे व्यवस्थित ज्ञान असणे अनिवार्य आहे. मातृभाषेतून शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, असे विनोबा म्हणतात.
आज आपण सर्व मोबाईल घ्या जगात वावरत आहोत. हे जे बिनाआवाजाचं भाषेचं जग आहे, त्यातच आपण वावरत राहिलो तर कदाचित माणूस बोलणं विसरून जाईल. पूर्वी संवादामुळे समाज बनत होता.आज समाज नाहीसा होऊन नेटवर्क निर्माण झाली आहेत.
समाजातून जर संवादच नाहीसा झाला तर समाज विखरुन जाईल. माणसे एककल्ली होतील. ओठ, दात, जीभ यांच्या मदतीने आपण जे बोलणे शिकलो, त्या भाषेचा अंत होईल. म्हणून आपले मन मोकळे करण्यासाठी मातृभाषेतून संवाद साधणे गरजेचे.
लेखिका –
सौं. विभा प्रल्हाद भुसारी
माजी मुख्याध्यापिका, नागपूर.
Author: सौं. विभा प्रल्हाद भुसारी
लेखिका एक उत्कृष्ट शिक्षिका, मुख्याध्यापिका, विद्यार्थीनी मार्गदर्शिका, कवयित्री, लेखिका (सामाजिक, शैक्षणिक लेखन) आहेत. सोबतच अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती (महिलांची) नागपूर जिल्हा अध्यक्षा म्हणून समाजात वाईट प्रथा व परंपरा बंद करण्याचे सुद्धा अलौकिक कार्य त्या करत असतात. त्याच बरोबर विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य निरंतर त्या करत असतात. आपले प्रगल्भ व विद्रोही विचार सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आमच्या वाचकांसाठी नेहमी मांडत असतात.






