डोळ्यात अश्रू आणणारे आणि समतेचा विचार देणारे ‘पाण्याने पेटला वणवा’ नाटक आता विदर्भात; १५ ऑक्टोबरपासून ११ शहरांत प्रयोग!

SHARE:

नागपूर : तहान भागवण्यासाठी पाणी घेण्याचा अधिकार नाकारला गेलेला तो काळ, आणि त्या अमानुष सामाजिक वास्तवाविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेला ऐतिहासिक लढा! याच ज्वलंत संघर्षाची कहाणी आता विदर्भाच्या रंगभूमीवर साकारणार आहे. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध शहरांत रसिकांची उदंड दाद मिळवल्यानंतर ‘युगंधर क्रिएशन्स एल.एल.पी.’ प्रस्तुत ‘पाण्याने पेटला वणवा’ हे ऐतिहासिक मराठी नाटक १५ ऑक्टोबरपासून विदर्भातील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विदर्भातील ११ शहरांमध्ये या नाटकाचे एकूण १२ प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.
सार्वजनिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रस्तुत हे नाटक असून मानवी प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि समतेच्या विचारांची अभूतपूर्व मांडणी रंगमंचावर करते.

चवदार तळ्याचा ऐतिहासिक संघर्ष रंगमंचावर जिवंत
२० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे झालेला चवदार तळे सत्याग्रह हा भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक निर्णायक टप्पा ठरला. हा संघर्ष केवळ पिण्याच्या पाण्यापुरता मर्यादित नव्हता, तर माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याचा, सामाजिक विषमतेला आव्हान देण्याचा आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्रस्थापित करण्याचा लढा होता. ‘पाण्याने पेटला वणवा’ हे नाटक महाडच्या या ऐतिहासिक सत्याग्रहाची स्मृती आणि अन्यायाविरुद्धचा लढा रंगमंचावर अत्यंत ताकदीने उभा करते.

नाटकाचे सूत्रधार आणि कलाकार
या महत्त्वपूर्ण नाटकाचे लेखन माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी केले असून, दिग्दर्शन प्रशांत निगडे यांनी केले आहे. नाटकाची निर्मिती शारदा रा. बडोले यांची असून सह-निर्मिती गणेश मोडक यांची आहे. नाटकाला संगीत सुशिल पांचाळ यांचे लाभले आहे, तर सुप्रिया बर्वे यांनी वेशभूषा आणि मिलिंद कोरचेकर यांनी रंगभूषा सांभाळली आहे. प्रकाश योजना मंदार देशपांडे यांची आहे. या नाटकात प्रशांत पांचाळ, मयुरी मढवी, मयुरी निकम, तेजस राजे, राजू भिलोरे, अजित रांजणे, दत्ता शेट्ये, अमोल जाधव, सुभाष हर्डीकर, सायली नंदा, मृणालिनी, योगेश गायकवाड, मृणाल किसमराव आणि प्रेम जेठीथोर यांसारखे विविध गुणवंत कलाकार वेगवेगळ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा जिवंत करणार आहेत.

विदर्भातील दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक :
१५ ऑक्टोबर : चंद्रपूर
१६ ऑक्टोबर : नागपूर
१७ ऑक्टोबर : वर्धा
१८ ऑक्टोबर : गडचिरोली
१९ ऑक्टोबर : भंडारा
२१ ऑक्टोबर : यवतमाळ
२२ ऑक्टोबर : अमरावती
२३ ऑक्टोबर : बुलढाणा
२४ ऑक्टोबर : वाशीम
२५ ऑक्टोबर : अकोला
२७ ऑक्टोबर : गोंदिया
इतिहासातील हा परिवर्तनाचा आणि समतेचा लढा अनुभवण्यासाठी विदर्भातील सर्व नाट्यप्रेमींनी या नाटकाचे प्रयोग आवर्जून पाहावेत, असे आवाहन निमंत्रक प्रशांत सहारे (मो. ९७६४४१२५९८) आणि सचिन मून (मो. ९८५०६७७७७६) यांनी केले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा