नागपूर : जिल्ह्यातील शेकडो वर्षांचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेली महायोगी गोरखनाथ यांची तीन पुरातन मंदिरे आज बेकायदेशीर अतिक्रमण, अनास्था आणि वादाच्या विळख्यात अडकली आहेत. या ऐतिहासिक मंदिरांचे अस्तित्वच धोक्यात आल्याचा खळबळजनक आरोप करत ‘महाराष्ट्रीय संपूर्ण नाथजोगी समाज सुधार संस्था’ आणि ‘गोरखनाथ मंदिर सेवा समिती’ यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे.
पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष मनीष रमेश पुंड आणि सल्लागार योगी शंकरनाथ जाधव यांनी मंदिरांच्या जमिनी हडपणाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत, गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षाची शासनाने तात्काळ दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
जागनाथ बुधवारी येथील १०७ वर्षांच्या ऐतिहासिक वारशावर डल्ला :
पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, जागनाथ बुधवारी परिसरातील सुमारे २,७०० चौरस फूट जमीन १९०९ मध्ये माधवराव हरबाजी वैश्य यांनी नाथ संप्रदायाचे महंत जानकीनाथ गुरु तीरकानाथ यांना नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे दान दिली होती. ही जागा केवळ गोरखनाथ मंदिरासाठीच वापरण्यात यावी आणि तिची खरेदी-विक्री किंवा हस्तांतरण होऊ नये, अशा स्पष्ट अटी या दानपत्रात होत्या.
मात्र, धीरजनाथ नामक महंताच्या माध्यमातून वैयक्तिक मालकी प्रस्थापित करण्यासाठी संशयास्पद कागदपत्रे तयार करण्यात आली. यात विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) पदाधिकारी अमोल ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचा थेट आरोप संस्थेने केला आहे.
२००२ मध्ये मंदिराच्या जमिनीच्या अभिलेखांमध्ये नाव नोंदवून २००६ मध्ये त्यावर बेकायदेशीर बांधकाम सुरू करण्यात आले. धार्मिक कार्यासाठी दिलेल्या जागेचा व्यावसायिक वापर करून मूळ अटींचे उल्लंघन करण्यात आले.
मूर्तींची विटंबना व प्रवेशबंदी : मंदिरातील पुरातन तळघर व जुने बांधकाम पाडून महायोगी गोरखनाथ, साईबाबा आणि भगवान दत्तात्रेय यांच्या मूळ मूर्तींची विटंबना करून त्यांना स्थानावरून हटवण्यात आले. मुख्य प्रवेशद्वारावर वाहनतळासाठी टिनशेड उभारून नाथजोगी समाजातील भाविकांना पूजेपासून वंचित ठेवून धमक्या व गुंडगिरी केली जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
लकडगंज व रामटेक येथील मंदिरांवरही ताबा मिळवण्याचा प्रयत्न :
केवळ जागनाथ बुधवारीच नव्हे, तर नागपुरातील अन्य दोन महत्त्वाच्या मंदिरांवरही असाच डल्ला मारल्याचा आरोप संस्थेने केला आहे. विमलेश्वरनाथ गोरखनाथ मंदिर (लकडगंज) दाणागंज चौकातील सुमारे १५ हजार चौरस फूट जागेवर ट्रस्टच्या नावाखाली अनधिकृत दुकाने उभारून धार्मिक जागेचा व्यावसायिक वापर सुरू आहे. तसेच संस्थापकमहंत पितरनाथजी यांच्या मूर्तीची अवहेलना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आदिनाथ गोरखनाथ मंदिर रामटेक येथील सुमारे ५५ एकर जमिनीच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिराच्या शेतजमिनीचा काही भाग हॉटेल व इतर व्यावसायिक वापरासाठी देण्यात आला असून, मूळ विकास आराखडा बाजूला सारून जमिनीवर अतिक्रमणे वाढली आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा गैरवापर :
विश्व् हिंदू परिषदेचे अमोल ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या ‘अखिल भारतवर्षीय अवधूत भेष बारह पंथ योगी महासभा’ या धार्मिक संस्थेशी संबंध असल्याचा भास निर्माण करून लोकांची दिशाभूल केली आहे. योगी महासभेच्या नावाचा वापर करून मंदिराच्या कोट्यवधींच्या जमिनी हडपण्याचा हा प्रयत्न असून, याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही तक्रार नोंदवून या गैरवापराला आळा घालण्याची मागणी करण्यात येणार आहे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धाव :
हिंदू धर्म आणि मंदिरांच्या संरक्षणाचा दावा करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याकडूनच एका प्राचीन हिंदू संप्रदायाची जमीन बळकावली जात असल्याबद्दल नाथजोगी समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर समाजाने खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत :
स्वतःला धर्मरक्षक म्हणवून घेणाऱ्या अमोल ठाकरे यांची विश्व हिंदू परिषदेतून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून नाथजोगी समाजाला न्याय मिळवून द्यावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल, धर्मादाय आणि पोलीस प्रशासनामार्फत तिन्ही मंदिरांच्या जमिनी, दानपत्रे व बांधकामांची निष्पक्ष चौकशी करावी, तसेच मंदिर संरक्षणासाठी लढा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण द्यावे.
आंदोलनाचा इशारे व उपस्थित मान्यवर :
“गेल्या २० वर्षांपासून नाथजोगी समाज आपल्या धार्मिक हक्कांसाठी आणि वारशासाठी शांततापूर्ण मार्गाने संघर्ष करत आहे. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून अतिक्रमणे हटवली नाहीत आणि समाजाला पूजा-अर्चेचा अधिकार बहाल केला नाही, तर राज्यभरात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा सज्जड इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेला अध्यक्ष मनीष रमेश पुंड, सचिव पुरुषोत्तम कोकाटे, कोषाध्यक्ष साहिल जाधव, सल्लागार योगी शंकरनाथ जाधव यांच्यासह दयालनाथ नानवटकर, सारंग साखरे, स्वप्नील शिंदे, अजय तिहिले, प्रशांत चतुर्भुज, गोपालनाथ राऊत, सौरभ खुजनारे, वैद्य सुरेशजी इंगळे, ईशांत वताखरे, भरत विजयकर, आनंदरावजी जाधव, महेंद्र राऊत, दिनेश नानवटकर, विजय पुंडेकर, मंजुषा जोगी, शालिनीताई जाधव, उमेश पवार, कैलासनाथ वंजारी आणि प्रेमनाथ बनसोड आदी प्रमुख सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






