नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक: अभिजित वंजारी यांच्या कॉलेजला बेकायदेशीर सुट्टी देवून शिक्षकांचा प्रचारासाठी वापर? तक्रार दाखल

SHARE:

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, राजकीय वर्तुळात तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसचे नेते तथा उमेदवार अभिजित वंजारी यांच्या संस्थात्मक ‘गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड तंत्रज्ञान’ (हुडकेश्वर/चिखली, नागपूर) येथे कोणतीही शासकीय सुट्टी नसताना विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन, तेथील प्राध्यापक व शिक्षकांचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी साहिल दरणे यांनी नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच या पत्राच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ च्या कुलगुरू यांच्याकडेही माहिती व पुढील योग्य कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

नेमकी काय आहे तक्रार?

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषित झालेली असताना, उमेदवार अभिजित वंजारी यांच्या कॉलेजमध्ये मागील ३ दिवसांपासून कोणतीही शासकीय अथवा अधिकृत सुट्टी नसताना महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे.

संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालय अचानक का बंद ठेवण्यात आले अथवा सुट्टी नेमकी कशासाठी देण्यात आली, याबद्दल कोणतीही स्पष्टता किंवा पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही.

तसेच, शैक्षणिक कामकाज पूर्णपणे ठप्प ठेवून तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रचाराच्या कामाला जुंपले जात असल्याची तक्रार समोर येत आहे. जर शैक्षणिक संस्था बंद ठेवून शिक्षकांचा वापर राजकीय किंवा निवडणुकीच्या प्रचारासाठी केला जात असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान तर होत आहेच, शिवाय ही बाब आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन करणारी आहे का, याचीही तत्काळ तपासणी होणे गरजेचे आहे.

निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी कठोर कारवाईची अपेक्षा

लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणतीही निवडणूक निष्पक्ष, भयमुक्त आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणे हे अत्यंत आवश्यक असते. सत्ता किंवा संस्थेच्या संसाधनांचा गैरवापर करून निवडणुकीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न होत असेल, तर प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करावी, असा सूर आता उमटू लागला आहे.

आता या अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी, नागपूर विद्यापीठ प्रशासन आणि राज्य शासन काय भूमिका घेते आणि चौकशीचे काय आदेश देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा