गरबा
रंगीत ओढणी, चणिया घोळदार
ढोल वाजता मन जाई मनाच्या पार ll
नऊ दिवस देवीची आराधना असते खास,
गरब्याच्या तालावर जुळतो श्वास ll
हातात टाळी पायात ठेका,
सख्यांसोबत नृत्यात करू नका चुका ll
झेंडूची माळ, दिवसांची रोषणाई,
आई भवानीची कृपा बरसत राही ll
सभ्य पोशाखात शोभे खरी नारी,
संस्कृती जपते तीच गरबा सुंदरी ll
गरबा आता कोणाला नवीन राहिला नाही. गरबा हा फक्त नाच नाही, ती भक्ती आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा मातेच्या सन्मानार्थ गरबा केला जातो. मध्यभागी दीप तेवत ठेवलेला असतो. त्याला गर्भ दीप म्हणतात.
गर्भदीपाभोवती नृत्याचा फेर धरल्या जातो..गोल गोल फिरत नृत्य करणे म्हणजे जीवनचक्र आणि देवी शक्तीला वंदन करणे होय. ढोला च्या तालावर एकत्र नाचल्याने समाजात एकता निर्माण होतो आणि आनंदाची व्याप्ती वाढते..
समाजाचा दृष्टिकोन
सन्मानाचा : गरब्याकडे फक्त मनोरंजन म्हणून न पाहता, तो आपली संस्कृती आणि स्त्री शक्तीचा उत्सव आहे म्हणून पाहावे.
सुरक्षिततेचा : गरबा मंडप हे महिलांसाठी, मुलींसाठी सुरक्षित ठिकाण असावे. सर्वांनी मिळून सर्वांसाठी आदराची भावना ठेवावी.
सर्वसमावेशक : जात-पात, वय, श्रीमंत-गरीब न पाहता सर्वांनी एकत्र येऊन आनंद घ्यावा, हाच खरा गरबा.
महिलांचे नृत्य व पोशाख
हा प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस आहे पण पारंपरिक दृष्टिकोन असा आहे –
पोशाख : सभ्य आणि पारंपरिक असावा. चणिया-चोळी सोबत ओढणी/दुपट्टा असणे हे आपल्या मराठी-गुजराती संस्कृतीची शान आहे. अंग झाकलेले पण रंगीबेरंगी, आरसे लावलेल्या आरशाच्या कामाचा ड्रेस गरब्याची खरी ओळख आहे. प्रत्येक स्त्रीने अंगभर घातलेला कोणत्याही रंगाचा ओढणी वाला ड्रेस अगदी परफेक्ट उदाहरण आहे. अंगप्रदर्शनं करणारे पोशाख नको. पुरुषांनी देखील गरब्याला साजेसे पोशाख परिधान करावे.
नृत्य : गरब्यात मजा, उत्साह असतोच, पण त्यात भक्तीभाव आणि लय असावी. हाताची टाळी, पायाची ठुमक आणि गोल रिंगणात फिरणे – यात शालीनता आणि आनंद दोन्ही दिसतो. कोणालाही त्रास होणार नाही, स्वतःलाही असुरक्षित वाटणार नाही असा नाच सर्वात सुंदर असतो.
नुकतेच वाचण्यात आले की नाचण्यातील जोश वाढविण्यासाठी काही लोक विचित्र गोळ्या औषधे घेतात. कृत्रिम शक्ती वाढविण्यासाठी केलेले उपाय हे अत्यंत चुकीचे आहे.
थोडक्यात, गरबा म्हणजे – भक्ती, संस्कृती, सुरक्षित आनंद यांचा सुरेख संगम असावा. सर्वांनी योग्य पद्धतीने योग्य पोशाखात सभ्यपणे गरबा करणे, तेच खरे आपल्या संस्कृतीचे जतन आहे. भक्ती, संस्कृती, सुरक्षितता यासह गरबा करणे खूप अभिमानास्पद आहे !
लेखिका –
डॉ. शोभा गायकवाड, अमरावती.
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याच्या अभ्यासक, अमरावती.
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






