तुका म्हणे, शोभा सांगे…
संत तुकाराम पंढरपूरच्या पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते. तुकारामांनी पांडुरंगाचे केलेले वर्णन वर्णनातीत आहे. पांडुरंगाचे वर्णन करताना तुकारामांनी एकेक शब्द जणू रत्नजडित खजिन्यातून शब्दरूपी हिरे माणके बाहेर काढलेले आहेत. तुकारामांनी पांडुरंगाचे वर्णन केलेले अभंग शिकत रहावे किंवा वाचत रहावे असे वाटत राहते.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा l रवि शशिकळा लोपलिया ll
हा देव सुंदर, सुकुमार, मदनाचा पुतळा आहे. त्याच्या तेजापुढे सूर्यचंद्राच्या प्रभा लोपून जातात. त्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवट भरलेला आहे. अंगाला चंदनाची उटी लावलेली आहे. गळ्यात वैजयंती पुष्पांची माळा डोलत आहे. डोक्यावर मुगुट, कानात कुंडले आहेत. त्यामुळे श्रीमुख शोभून दिसत आहे. ते सुखाचेच ओतलेले आहे.
कासे सोनसळा पांघरे पाटोळा l घननीळ सांवळा बाईयानो ll
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा l तुका म्हणे जीवा धीर नाही ll
कमरेला जरीकाठी पितांबर नेसला आहे. अंगावर शेला धारण केला आहे. अंगकांती मेघाप्रमाणे निळ्या रंगाची सुंदर दिसत आहे. असे सुंदर रूप न्याहाळून पाहण्यासाठी ते पांडुरंगाच्या आजुबाजूच्या बायांना दूर होण्यास सांगतात. कारण त्यांना धीर धरवत नाही.
सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती..
संत तुकारामांचे विठ्ठलावर उच्च कोटीचे आणि अनन्य साधारण प्रेम आहे. असे प्रेम कोणीही आजवर केले नसेल. आपले डोळे सदा त्या विठ्ठल मूर्तीवर जडलेले असावेत. विठ्ठलाचे रूप गोड आहे. विठ्ठलाचे नाव गोड आहे. म्हणून सदैव तुकारामांचे मन विठ्ठलाजवळ घुटमळत असते. म्हणूनच विठ्ठल कायम त्यांच्या हृदयात राहण्यासाठी ते विठ्ठलाला वर मागतात. विठ्ठलचरणी सर्व सुखांच्या राशी त्यांना गवसतात.
समचरण विटेवरी साजिरी l तेथे माझी हरी वृत्ती राहो ll
संत तुकारामांची दृष्टी विठ्ठलाच्या संमचरणाकडे लागलेली असते पण तरीही या सुंदर रूपाच्या ठिकाणी मन सदैव लागून रहावे यासाठी ते पांडुरंगाला प्रार्थना करतात. एका पांडुरंगाशिवाय त्यांना सर्व गोष्टी मायिक वाटतात. मायिक पदार्थांचे वर्म समजल्याने त्या ठिकाणी चित्त जाऊ सुद्धा नये. कारण कर्मापासून जे उत्पन्न होते ते पुढे नाश पावते. म्हणून पांडुरंगा शिवाय इतर गोष्टी मिळाव्यात असे त्यांना वाटत सुद्धा नाही. पांडुरंगाचे एकच नाव आणि रूप अक्षय आहे. विठ्ठलाच्या नावात आणि रूपात तुकाराम अक्षरशः वेडेपिसे झालेले दिसतात.
त्यांच्या डोळ्यासमोर ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ दिसते. कमरेवर हात ठेवून विटेवर उभे असलेले विठ्ठलाचे सुन्दर रूप त्यांच्या डोळ्यासमोर दिसते. विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीचा हार आहे. कमरेला पितांबर नेसलेला आहे असे ध्यान तुकारामांना फार आवडते. कानात मकर कुंडले झळकत आहेत, गळ्यात कौस्तुभ मणी शोभत आहे. असेच श्रीमुख संत तुकाराम दिनरात आवडीने पाहतात. संत तुकाराम आपल्या आवडत्या आराध्य दैवताचे वर्णन करताना थकत नाहीत.
गरुडाचे वारीके कासे पीतांबर l सावळे मनोहर कै देखेंन ll
गरुड वाहनावर आरुढ झालेले, कमरेला पीतांबर नेसलेले, श्यामसुंदर मनोहर रूप डोळ्यांना, दिसण्यासाठी ते आतुर झालेले आहेत. तुकारामांनी वर्णिलेले हे रूप त्यांना उत्तमातील उत्तम, मेघाप्रमाणे सावळ्या वर्णाचे आहे. गळ्यात वैजयंती फुलांची माळा शोभून दिसत आहे. कोट्यवधी सूर्याच्या तेजाप्रमाणे झळकनारा मुकुट मस्तकावर आहे. गळ्यामध्ये निर्मळ कौस्तुभ रत्न शोभून दिसत आहे. पांडुरंगाचे मुख सर्व सुखांनी ओतलेले दिसत आहे. त्याच्या डाव्या हाताला सुंदर रूपाची रखुमा बाई आहे. दोन्ही बाजूला उद्धव व अक्रूर आहेत. सनकादिक मुनी त्यांची कीर्ती वर्णन करीत आहेत. हा पांडुरंग इतर कोणासारखा नाही, अद्वितीय आहे. म्हणून तोच तुकारामांचा सखा आहे.
तुका म्हणे माझी पुरवावी आस l विनंती उदास करू नये ll
तुकारामांना पांडुरंगाचे रूप वारंवार पाहण्याची आस लागलेली आहे. त्या रूपाच्या झुरणीने तुकारामांचे शरीर अस्थिपंजर होऊ पाहत आहे. त्याआधी पांडुरंगाने दर्शन द्यावे. उदास करू नये. अशी कळकळीची विनंती सतत ते पांडुरंगाला करतात.
तुकारामसारखा आर्त भक्त विरळाच. इहलोकीचा हा पसारा क्षणभंगुर आहे, नाशिवंत आहे. एक देवच खरा आहे, असा त्यांचा विश्वास होता. हा देव कोठे भेटेल, त्याला केव्हा आलिंगन देऊ, त्यांच्याशी केव्हा आणि कसे बोलू, असे त्यांना झाले होते. पाण्या बाहेर काढलेल्या मासोळीप्रमाणे त्यांच्या जीवाची तडफड चालली होती. देवाचा व देवाच्या रूपाचा आठव सदैव त्यांना स्मरत होता.
लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






