नागपूर मनपात महाभूकंप : राजकीय दबावापोटी अवैध बांधकामावरील कारवाई थांबवल्याची सहाय्यक आयुक्तांची ऑन-कॅमेरा कबुली!

SHARE:

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या हनुमान नगर (झोन क्र. ३) येथील एका बेकायदेशीर आणि विनापरवाना दोन मजली बांधकामावर कारवाई करण्यासाठी सत्ताधारी राजकीय नेत्यांचा प्रचंड दबाव असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आमदार मोहन मते आणि माजी आमदार संदीप जोशी यांच्या दबावाखाली येऊन अधिकृत कारवाई रोखल्याची थेट ऑन-कॅमेरा कबुली झोनचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र बावणकर यांनी दिली असल्याचा खळबळजनक आरोप ‘बळीराजा पार्टी’ने नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

पत्रकार परिषदेत बळीराजा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र धावडे, विदर्भ महासचिव व शहर प्रभारी डॉ. शेखर दंताळे, ग्रामीण अध्यक्ष लोकेश भुरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सहाय्यक आयुक्त नरेंद्र बावणकर यांच्या दालनातील व्हिडिओ पुरावे माध्यमांसमोर सादर करण्यात आले.

नेमका काय आहे घटनाक्रम आणि प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान नगर झोनअंतर्गत रामलीला लॉनजवळ, जुना नरळा रोड येथे प्रकाश मुरलीधर कैकाडे यांनी सन २०२४-२५ मध्ये नागपूर मनपाची कोणतीही परवानगी न घेता दोन मजली अवैध इमारत उभारली आहे.

या अवैध बांधकामावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३(१) (MRTP Act Section 53) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. ३० दिवसांची मुदत संपल्यानंतरही कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ. शेखर दंताळे यांनी सहाय्यक आयुक्त नरेंद्र बावणकर यांना विचारणा केली.
त्यावेळी बावणकर यांनी स्वतःच्या शासकीय खुर्चीवर बसून ‘आमदार मोहन मते आणि माजी आमदार संदीप जोशी यांच्या फोनमुळे व दबावामुळे मी कारवाई थांबवली’ असे ऑन-कॅमेरा मान्य केले.

शासकीय गोपनीयतेचा भंग आणि दिशाभूल?

पत्रकार परिषदेत बळीराजा पार्टीने मनपाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले : 
१. शासकीय माहितीची गळती : मनपा आयुक्तांनी दिलेली तातडीची नोटीस केवल तीन लोकांपर्यंत मर्यादित असताना, त्याच रात्री अवैध बांधकाम धारकाला याची माहिती कशी मिळाली? यात शासकीय गोपनीयतेचा भंग आणि संगनमत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
२. खोटी कारणे व नियमांचा गैरवापर : गुंठेवारी कायदे आणि एनआयटीचे (NIT) जुने नियम सांगून कारवाई टाळण्याचा प्रयत्न बावणकर यांनी केला. प्रत्यक्षात हे बांधकाम २०२४-२५ मधील असल्याने त्याला गुंठेवारी किंवा जुने नियम लागू होत नाहीत.
३. व्हीआयपी नावांचा वापर : कारवाई रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव (PA) शशांक दाभोळकर यांच्या नावाचाही खोटा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

या संपूर्ण प्रकरणात तक्रारदार डॉ. शेखर दंताळे यांच्यावरच प्रशासकीय पदाचा धाक दाखवून नोटीस बजावण्यात आली व त्यांचा छळ करण्यात आला, असा आरोपही पक्षाने केला आहे.

बळीराजा पार्टीच्या प्रमुख मागण्या :
१. सहाय्यक आयुक्तांचे निलंबन : शासकीय गोपनीयतेचा भंग, पदाचा गैरवापर व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त नरेंद्र बावणकर यांना तातडीने सेवेतून निलंबित करून त्यांची सखोल चौकशी व्हावी.
२. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि EOW मार्फत चौकशी : दबाव टाकणारे नेते आणि यामध्ये सहभागी अधिकाऱ्यांवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात यावा.
३. अवैध बांधकाम तत्काळ पाडावे : प्रकाश कैकाडे यांच्या अवैध इमारतीवर २४ तासांच्या आत निष्कासन मोहीम राबवून ते पूर्णतः पाडण्यात यावे.
४. कार्यकर्त्यांवरील खोट्या नोटिसा रद्द कराव्यात : सामाजिक कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने पाठवलेल्या नोटिसा मागे घेण्यात याव्यात.

आंदोलनाचा इशारा :
“येत्या ७ दिवसांत सहाय्यक आयुक्त नरेंद्र बावणकर यांचे निलंबन झाले नाही आणि अवैध बांधकामावर मनपाने तत्काळ हातोडा चालवला नाही, तर नागपूर मनपा मुख्यालयासमोर तीव्र जनआंदोलन आणि धरणे आंदोलन छेडले जाईल.” — डॉ. महेंद्र धावडे (राष्ट्रीय अध्यक्ष, बळीराजा पार्टी) व डॉ. शेखर दंताळे (विदर्भ महासचिव)

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा