नागपूर : नागपूर शहर पोलीस आयुक्तालयअंतर्गत गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाड टाकून तब्बल १ कोटी ५४ लाख ५० हजार ७०० रुपयांचा एमडी (Mephedrone) पावडरचा मोठा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी ५ जणांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली असून, नगरसेवकावरील फायरींग प्रकरणातील कुख्यात मकोका व एनडीपीएस गुन्ह्यातील मुख्य पाहिजे आरोपी विशाल उर्फ फल्ली यास त्याच्या मैत्रिणीसह तामिळनाडूतील रामेश्वरम येथून जेरबंद करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे.
फ्लॅटवर छापा आणि १,४०५ ग्रॅम एमडी जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४.२० वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून बेलतरोडी हद्दीतील नरेंद्र नगर, रिंग रोडवरील भारत पेट्रोल पंप बाजूकडील विजया अपार्टमेंटमधील तिसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटवर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पंचासमक्ष खालील पाच आरोपी मिळून आले :
१. अनिकेत उर्फ अन्नु संजय बिहारे (वय १९, रा. वाठोडा, नागपूर)
२. तुफानसिंग बालुसिंग सिसोदीया (वय ३८, रा. झालावाड, राजस्थान)
३. कृष्णा उर्फ पहेलवार सुनिल वर्मा (वय १९, रा. गणेशपेठ, नागपूर)
४. राहुल उर्फ भाया राजकुमार गोंड (वय ३२, रा. वाठोडा, नागपूर)
५. शुभम उर्फ डोरेमॉन दिलीप नरवरीया (वय ३१, रा. मानेवाडा, नागपूर)
झडती घेतली असता, आरोपींच्या ताब्यातून १,४०५ ग्रॅम एमडी पावडर, ६ मोबाईल फोन, फ्लॅटमधील दिवाणवर ठेवलेली ३,४४,७०० रुपयांची रोकड, एक वर्ना कार, ४ दुचाकी वाहने, वजनकाटा असा एकूण १,५४,५०,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राजस्थानवरून आणली होती एमडी पावडर
आरोपींची कसून चौकशी केली असता, अनिकेत बिहारे आणि वाठोड्यातील फरार तस्कर विशाल उर्फ फल्ली पुथ्वीलाल गुप्ता यांनी राजस्थानमधील संशयित तुफानसिंग सिसोदीया व त्याच्या मित्राकडून ही एमडी पावडर मागवली असल्याचे निष्पन्न झाले. तुफानसिंगने ती नागपुरात आणून दिली होती. आरोपी विशाल उर्फ फल्ली याच्या सांगण्यावरून ही पावडर शहरातील इतर किरकोळ विक्रेत्यांना मागणीनुसार विकली जात होती. तसेच जप्त केलेली रोकड ही किरकोळ विक्रेत्यांकडून ॲडव्हान्स स्वरूपात घेण्यात आली होती.
याप्रकरणी वरील ५ जणांसह कुणाल दशरथ समुद्रे (वय २९, रा. महाल, नागपूर) व इतर पाहिजे आरोपींविरोधात बेलतरोडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
कुख्यात तस्कर विशाल ‘फल्ली’ रामेश्वरममधून अटकेत
गुन्ह्यातील मुख्य पाहिजे असलेला आरोपी विशाल उर्फ फल्ली पुथ्वीलाल गुप्ता (रा. श्रावणनगर, वाठोडा) हा त्याची मैत्रिण सहेली पंधराम उर्फ सोनु हिच्यासह तामिळनाडूतील रामेश्वरम येथे लपून बसल्याची माहिती तांत्रिक तपासातून पुढे आली. गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे पाळत ठेवून दोघांनाही ताब्यात घेतले आणि न्यायालयाकडून ट्रान्झीट रिमांड प्राप्त करून त्यांना नागपूर येथे आणण्यात येत आहे.
आरोपी विशाल फल्ली हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून, तो भांडेवाडी हद्दीत नगरसेवक शुभम मोटघरे यांच्यावर झालेल्या गोळीबार व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील मुख्य पाहिजे आरोपी आहे. त्याच्यावर यापूर्वीच मकोका अंतर्गत कलमवाढ करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, मकोका आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या अनेक महिन्यांपासून स्वतःचे अस्तित्व लपवून फरार होता.
पोलिसांचे यशस्वी मार्गदर्शन व कारवाई
सदर महत्त्वाची कामगिरी पोलीस आयुक्त श्री. नागपूर शहर, सह. पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, सपोनि गणेश कदम, पोउपनि विशाल सांगोळे, एनडीपीएस पथक, सायबर सेलचे अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






