
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरु केले असल्याची चर्चा आहे. नुकतेच दोन्ही राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या आघाडीसाठी तयार नाहीत. दोन राष्ट्रवादींची युती झाल्यास आपण तात्पुरता राजकीय सन्यास घेऊ, असं जगताप यांनी जाहीरच करून टाकलं आहे. त्यामुळे त्यांना समजावण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करावा लागण्याची शक्यता आहे. अशातच आता महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यावर आपली भूमिका मांडली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत येऊन निवडणूक लढवायची असेल तर आधी सत्तेतून बाहेर पडा. मग सोबत येऊन निवडणूक लढवू, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी मांडली आहे. “अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं. उगीच ताकाला जाऊन भांड लपवू नये. सत्तेची फळं देखील तुम्ही चाखायची आणि विरोधात देखील तुम्हीच येऊन बसायचं, असं कसं चालेल? म्हणजे तुमची पाचही बोट तुपात, असं चालणार नाही. तुम्हाला जर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राहायचं असेल तर तुम्ही विरोधी बाकावर बसायला हवं”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
“अजित पवार यांनी राजीनामा देऊन बाहेर पडावं आणि मग सोबत यावं, असं झालं तर बरं होईल. तसं जर झालं तर मग तुम्ही नक्की जात्यात आहात की सुपात आहात हे आम्हाला देखील कळेल. तुम्ही सत्तेसाठी तिकडे राहता आणि इथे शहरात भीती वाटत आहे म्हणून इकडे याल. एक तरी तिकडे राहा किंवा इकडे या नाहीतर स्वतंत्र लढा. असं झालं तर काही होऊ शकत नाही. तर तुम्ही म्हणाल पालकमंत्री देखील आमचा असेल, आम्ही सत्तेत देखील बसू, आमचे मंत्रिमंडळात देखील सदस्य असतील आणि विरोधी पक्षात सुद्धा आम्ही तुमच्यासोबत राहू असं कसं चालेल?”, असं म्हणत वसंत मोरे यांनी अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
शिवसेना मनसे युती फिक्स
दुसरीकडे पुणे शहरात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्यावर शिक्कामोर्तब सुद्धा वसंत मोरे यांनी केला आहे. ‘आम्ही तर शिवसेना म्हणून मनसेला सोबत घेतलं आहे. महाराष्ट्रातील 5 शहरांमध्ये आमची युती जवळपास झाली आहे. मनसे आणि शिवसेना आम्ही तर एकत्र झालो आहोत. बाकीच्यांनी सोबत कसे यायचं हे त्यांनी त्यांचं ठरवावं. मोर्चा, आंदोलन, पत्रकार परिषद यामध्ये मनसे चालते. मग भाजप विरोधात निवडणुकीसाठी का नाही?’ असं मोरे म्हणाले आहेत.





