मंत्री जयकुमार रावल यांना धक्का, बालेकिल्ल्याला खिंडार, अजित पवार गटाच्या महिला नगराध्यक्ष विजयी…

SHARE:

धुळे : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. धुळे जिल्ह्यातील १००  वर्षात पहिल्यांदा निवडणूक होणाऱ्या पिंपळनेर नगरपरिषदेमध्ये भाजपने आपला झेंड फडकवला आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. योगिता चौरे यांचा विजय झाला आहे. तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना धक्का बसला आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील विजयी झाल्या आहेत. संजना पाटील या नगराध्यपदाच्या उमेदवार होत्या. त्याचदरम्यान, सर्वात मोठी बातमी म्हणजे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात भाजपचे आमदार तथा मंत्री जयकुमार रावल यांना मोठा धक्का बसला आहे.

धुळ्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कलावती माळी यांचा दणदणीत विजय झाला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाल्यामुळे जयकुमार रावल यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या महिला नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. धक्कादायक बाब म्हणजे, कार्यकर्ते जल्लोषात अक्षरश: पैशांची उधळण करताना दिसून आले असून मतमोजणीनंतर हा प्रकार देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

दोंडाईचा नगरपरिषद आधीच बिनविरोध
दरम्यान, राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये भाजपचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये धुळ्यातील दोंडाईचा नगरपरिषदेचा देखील समावेश होता. येथे राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली या नगरपरिषदेमधील सर्व २६  जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. संपूर्ण बिनविरोध ठरणारी दोंडाईचा नगरपरिषद ही राज्यातील पहिलीच नगरपरिषद ठरली आहे. पण शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीमध्ये जयकुमार रावल यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

Leave a Comment

अधिक वाचा