
मुंबई : सोशल मीडियावर चर्चेत असणारी उर्फी जावेद सध्या वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. उर्फी नेहमीच तिच्या अतरंगी फॅशन आणि वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत असते. मात्र, सध्या उर्फी तिच्या एकापोस्टमुळे चर्चेत आली आहे. उर्फीनं तिची बहीण डॉली जावेद हिच्यासोबत पोलीस स्टेशनमधील काही फोटो शेअर केले असून, एका ‘भयंकर’ रात्रीचा अनुभव असं तिनं या फोटोंसोबत म्हटलं आहे. त्यामुळं उर्फीसोबत नेमकं काय घडलं? याबद्दल नेटकरी तिला प्रश्न विचारत आहेत.
काय घडलंय नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, उर्फीनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती आणि तिची बहीण डॉली पोलीस स्टेशनमध्ये बसलेल्या दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकताना या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं एका रात्री घडलेल्या थरारक घटनेचा उल्लेख केला आहे. उर्फीनं सांगितलं की, त्या रात्री त्यांच्यासोबत अत्यंत धक्कादायक असं घडलंय, ज्यामुळं त्यांना तातडीनं पोलिसांची मदत घ्यावी लागली आहे.
“ती रात्र आमच्यासाठी भयानक होती”
उर्फीनं तिच्या पोस्टमध्ये सविस्तर माहिती न देता केवळ त्या रात्रीच्या भीतीदायक वातावरणाबद्दल लिहिलं आहे. तिनं म्हटलं की, ती रात्र आमच्यासाठी अत्यंत भयानक होती. आम्हाला सुरक्षित ठेवल्याबद्दल आणि मदतीसाठी धावून आल्याबद्दल मी पोलिसांची अत्यंत ऋणी आहे.
तसंच पहाटेचे पाच वाजलेत आणि आम्ही पोलीस ठाण्यात आहोत. माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात भीतीदायक असा अनुभव होता. मी आणि माझी बहीण मिनिटही झोपलो नाहीये…असंही तिनं म्हटलंय.
या पोस्टमुळं तिचे चाहते चिंतेत पडले असून नेमकं काय घडलं होतं, याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, उर्फी सध्या सोशल मीडिया सोबतच काही टीव्ही शोंमध्ये दिसत आहे. लवकरच ती MTV Splitsvilla मध्येही दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं या शोचा प्रोमो शेअर केला होता. तसंच काही ब्रॅन्डच्या जाहिरातींमध्येही ती झळकते आहे.





