ग्राहकाने स्वतः ओटीपी शेअर केल्यास बँक दोषी नाही; ऑनलाईन फसवणूक प्रकरणात ग्राहक कोर्टचा निर्णय

SHARE:

मुंबई – गेल्या काही वर्षात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण चांगलेच वाढले असून अनेकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. आता या प्रकणात ग्राहक न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ग्राहकाने स्वतः ओटीपी शेअर केल्यास बँक दोषी नाही, असा महत्वपूर्ण निर्णय देत ग्राहक न्यायालयाने मुंबईतील एका रहिवाश्याची या संबंधित तक्रार फेटाळून लावली.

बनावट लिंकवर तक्रारदारने स्वतः क्लिक केल्याने आणि सर्व तपशील जुळल्याने ओटीपी जनरेट झाला. त्यामुळे बँकेकडे पैसे नाकारण्याचे कोणतेच कारण नसल्याचा बँकेचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. सोबतच, जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाने ऑनलाईन फसवणुकीला तक्रारदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं स्पष्ट करत हि तक्रार फेटाळून लावली. जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाचे अध्यक्ष प्रदीप कडू आणि सदस्या गौरी एम. कापसे यांनी हा निर्णय दिला.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, जानेवारी २०२२  मध्ये त्याचे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन रिन्यू करण्याचा प्रयत्न करत असताना, त्याने त्याच्या ईमेलमध्ये आलेल्या एका लिंकवर क्लिक केले. ईमेल नेटफ्लिक्सकडून आलेला नाही हे लक्षात न आल्याने त्याने त्यावर क्लिक केले आणि त्याचे कार्ड तपशील आणि एचडीएफसी बँकेकडून मिळालेला ओटीपी भरला. काही सेकंदांनंतर, त्याला बँकेकडून १,२५,६६५  रुपयांच्या व्यवहाराची पुष्टी करणारा एसएमएस आला.

सबस्क्रिप्शनची रक्कम फक्त ९८८ रुपये होती. त्याला समजले की तो सायबर घोटाळ्याचा बळी ठरला आहे आणि त्याने ताबडतोब बँकेशी तसेच पोलिसांच्या सायबर सेलशी संपर्क साधला. बँकेने त्यांची तक्रार बंद केली. बँकेने म्हटले कि आम्हाला आढळले की वरील व्यवहार एका सुरक्षित पद्धतीने करण्यात आला होता जो ओटीपीची पडताळणी केल्यानंतर झाला. जो गोपनीय आहे आणि फक्त कार्डधारकालाच माहिती आहे.

तक्रारदाराने असा युक्तिवाद केला की बेकायदेशीरपणे पैसे काढले जाणे हे बँकेच्या निष्काळजीपणामुळे होते आणि त्यांच्या सेवेत त्रुटी होती. मात्र बँकेने असा युक्तिवाद केला की तक्रारदाराने स्वतःच एका फसव्या लिंकवर क्लिक केले होते आणि सर्व तपशील त्याच्या क्रेडेन्शियल्सशी जुळत असल्याने एक ओटीपी जनरेट करण्यात आला. बँकेने व्यवहार नाकारण्याचे कोणतेही कारण नव्हते.

बँकेच्या उत्तराने समाधानी नसल्यामुळे तक्रारदाराने ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने दिलेल्या आदेशात तक्रारदार फसवणुकीला बळी पडल्याचे मान्य केले. परंतु तक्रारदाराने स्वतः फसवणूक करणाऱ्यांसोबत ओटीपी शेअर केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बँकेच्या सेवेत कोणतीही कमतरता नव्हती, असे ग्राहक आयोगाने म्हटले आहे. जर ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले असेल तर संपूर्ण नुकसान ग्राहकाला स्वतः करावे लागेल, बँकेचा हा युक्तीवाद ग्राहक न्यायालयाने मान्य करत तक्रर फेटाळून लावली.

Leave a Comment

अधिक वाचा