नाशिक – मालेगावातील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला. मात्र यावरून भाजपने नाहकच वाद निर्माण केला आहे. या प्रकरणावरून आता मालेगावातील इस्लाम पार्टीचे प्रमुख आणि माजी आमदार आसिफ शेख भाजपवर निशाना साधला आहे. आम्हाला शिवाजी महाराज आदरणीय आहेत, पण त्याचसोबत टिपू सुलतान यांचे कार्यही विसरता येणार नाही. इंग्रजांविरोधात देशासाठी लढताना बलिदान देणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का? असा सवाल माजी आमदार आसिफ शेख यांनी भाजपला विचारला आहे.
टिपू सुलतान हे वेगळ्या धर्माचे आहेत म्हणून भाजपकडून त्यांना विरोध केला जात आहे. मग भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता, असाही सवाल त्यांनी विचारला. इंग्रजांविरोधात देशासाठी लढताना बलिदान देणाऱ्या टिपू सुलतान यांचा फोटो लावला तर त्यामध्ये गैर काय आहे, असा सवालही माजी आमदार आसिफ शेख यांनी भाजपला विचारला आहे.
टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. इंग्रजांविरुद्ध देशातून पहिला आवाज हा टिपू सुलतान यांनीच उठवला. त्यांच्या कार्याची दखल भारतीय संविधानाने घेतली आहे. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांना एवढे वाईट का वाटते आहे? त्यांना तिरस्काराचे राजकारण करायचे आहे, दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत असा आरोप आसिफ शेख यांनी केला.
जो पाकिस्तान भारतावर हल्ला करतोय, त्यांच्याशी आपण क्रिकेट का खेळतोय? यांना फक्त कोट्यवधी रुपये कमवायचे आहेत म्हणून हे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतात. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं बंद करावं अशी मागणी आसिफ शेख यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आदर्श आहेत. पण 2014 नंतर देशात जातीयवादी आणि धार्मिक राजकारण सुरू झालं. त्या माध्यमातून विशिष्ठ एका धर्माला निशाणा केला जात आहे असा आरोप आसिफ शेख यांनी केला.
या प्रकरणावर एमआयएमचे प्रमुख खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांनी देखिल भाजपवर जोरदार टीका केली आहे. टिपू सुलतान यांनी ब्रिटीशांसोबत लढा देत हौतात्म्य पत्करले. तुमच्या सावरकर सारखे कारागृहात बसून माफीनामे लिहिले नाही, अशी बोचरी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. ते म्हणाले की एकीकडे टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून राजकारण करायचे आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून सट्टेबाजीच्या माध्यमातून हजारो कोटींची माया जमवायची, असा दुटप्पी चेहरा भाजपचा उघड झाला, असा टोला राऊतांनी लगावला आहे.




