कर्नाटक – कर्नाटक काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदाचा वाद आता चव्हाट्यावर आला असून, राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेस आमदारांनी आता उघडपणे बंडाचे निशाण फडकवले असून, “शिवकुमार यांना मुख्यमंत्री होण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही,” असा आक्रमक पवित्रा आमदारांनी घेतला आहे.
१३६ आमदार शिवकुमार यांच्या बाजूने?
काँग्रेस आमदार रविकुमार गौडा गणिगा यांनी खळबळजनक दावा केला आहे की, पक्षाचे सर्व १३६ आमदार डी.के. शिवकुमार यांच्या पाठीशी उभे आहेत. “शिवकुमार मागील ४० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्याकडे राजकीय रणनीती आणि चातुर्य आहे. ते सध्या अत्यंत शांतपणे आपल्या चाली रचत आहेत आणि लवकरच हा खेळ तेच जिंकतील,” असे गणिगा यांनी म्हटले आहे. तसेच, आम्ही भाजपमध्ये का जाऊ? आमचे नेते डी.के. शिवकुमार हे काँग्रेसमधूनच मुख्यमंत्री होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षश्रेष्ठींकडे ८० आमदारांची मागणी –
दुसरीकडे, आमदार इक्बाल हुसेन यांनी दावा केला आहे की, किमान ८० ते ९० आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्याची लेखी विनंती केली आहे. ही मागणी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा शिवकुमार यांनी नुकतीच नवी दिल्लीत १० जनपथ येथे पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिवकुमार यांनी सविस्तर तपशील देण्यास नकार दिला असला, तरी राजकीय चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले.
यतींद्र सिद्धरामय्या यांना शिस्तीचा इशारा –
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सुपुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यावरूनही पक्षात नाराजी पसरली आहे. यतींद्र सातत्याने आपल्या वडिलांच्या बाजूने वक्तव्ये करत असल्याने आमदार इक्बाल हुसेन यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. “प्रत्येक मुलाचे आपल्या वडिलांवर प्रेम असते, पण राजकारणात शिस्त पाळणे आवश्यक आहे. अशा विधानांमुळे पक्षश्रेष्ठींची अडचण होते आणि इतर नेत्यांना चिथावणी मिळते. त्यांनी शिस्तीत राहावे,” असा सल्ला हुसेन यांनी दिला आहे.
सत्ताबदलाचे संकेत –
कर्नाटकात सध्या सिद्धरामय्या मुख्यमंत्री असले तरी, शिवकुमार समर्थक आमदारांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात लवकरच खांदेपालट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. “जवाब बहुत जल्द मिलेगा” (उत्तर लवकरच मिळेल), या आमदारांच्या विधानामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत.





