मुंबई – राज्यातील महामार्गांवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे, असे राज्य परिवहन प्रशासनाने म्हटले आहे. या संदर्भात परिवहन खात्याने तसे आदेश दिले आहेत. राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभाग आता सक्रिय झाला आहे. राज्यातील समृद्धी महामार्ग आणि इतर मुख्य रस्त्यांवर खासगी ट्रॅव्हल्स, सरकारी वाहने, इतर मालवाहतूकीच्या वाहनांच्या अपघातांचे सत्र थांबवण्यासाठी, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे परिवहन विभाग प्रशासनाने म्हटले आहे.
राज्यात गेल्या काही काळात झालेल्या भीषण अपघातांमध्ये ड्रायव्हरने मद्यपान केल्याचे समोर आले आहे. आता राज्य सरकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अशा वाहन चालकांवर कायदेशीर कडक कारवाई करणार आहे. राज्यातील महामार्गावरील अपघातांचे गांभीर्य लक्षात घेता, आता बसमध्ये ब्रेक अॅनालायझर ही आधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. ही यंत्रणा बसवल्यानंतर ड्रायव्हरने दारू प्यायली असेल, तर ती बस सुरू होऊ शकणार नाही. या एका यंत्रणेची किंमत साधारण १.५ लाख रुपये इतकी आहे.
राज्यातील एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन बसेस तसेच टाटा आणि अशोक लेलँड कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी बस मालकांनीही आपल्या गाड्यांमध्ये ब्रेक ॲनालायझर ही आधुनिक यंत्रणा बसवावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्यात अनेक खासगी बस चालक स्लीपर कोचच्या नावाखाली बसच्या रचनेत बदल करतात, ज्यामुळे अपघाताच्या वेळी प्रवाशांना बाहेर पडणे कठीण होते.
पूर्वी एकच स्लीपर कोच असायचा, मात्र आता खासगी बसमध्ये दोन स्तरांवर स्लीपर कोच बसवले जात आहेत. परदेशात अशा स्लीपर कोचवर बंदी असली तरी भारतात केंद्र सरकारच्या नियमांनुसार ही सेवा सुरू आहे. महाराष्ट्राने यावर बंदी घातली तरी, इतर राज्यांत नोंदणी झालेल्या बस राज्यात येऊ शकतात, ही तांत्रिक अडचणही राज्य सरकारने सांगितली आहे. मात्र, राज्यातील कायद्यांचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि प्रवाशांच्या जिवाशी खेळणार्या सरकारी व खासगी बसेसवर कडक नजर ठेवली जाणार आहे, असे राज्यातील परिवहन विभाग प्रशासनाने म्हटले आहे.
राज्यातील सरकारी व खासगी चालवताना वेग मर्यादा आणि रस्ते सुरक्षेचा मास्टर प्लॅन राज्यातील परिवहन विभागाने बनवला आहे. राज्यातील खासगी व सरकारी बसेसच्या वाढत्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व बसमध्ये ८० किमी प्रतितास मर्यादेचा स्पीडोमीटर बसवण्याचे आदेश परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आहेत. काही खासगी बस १२० ते १४० किमी वेगाने धावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, राज्यातील अशा गाड्यांवर, वाहन चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
याशिवाय राज्यभरातील सर्व मुख्य रस्त्यांसाठी व सर्व महामार्गासाठी सुरक्षा आराखडा तयार केला आहे. यामध्ये रिफ्लेक्टर, अॅरोमार्किंग, यु-टर्न आणि स्ट्रेट लेनसाठी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. १००, २००, ३०० आणि ५०० मीटर अंतर दर्शवणारे बोर्ड राज्यांतील सर्वच मुख्य रस्त्यांवर आणि राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रांत लावले जाणार आहेत, असे राज्यातील परिवहन मंडळ प्रशासनाने म्हटले आहे. राज्यात अलीकडेच घडलेल्या सांगली जिल्ह्यातील प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
सांगली जिल्ह्यात एकाच बसचे चेसी नंबर वेगवेगळ्या प्रकारे वापरून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील फसवणूक प्रकरणात कायदेशीर चौकशी करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य प्रशासनाने दिली आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील मोठ्या अपघातांचे प्रमाण 1 टक्क्याने घटले आहे, आणि काही ठिकाणी छोट्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरी, हे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट राज्यातील परिवहन महामंडळाने ठेवले आहे. यासाठी राज्यातील सर्व महामार्गावर, आरटीओ चेकपोस्टवर वाहन चालकांची कडक तपासणी केली जाणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.




