शेअर बाजार : गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या, चांदीच्या किमतीत सतत चढउतार होते. आज आठवड्याच पहिल्या दिवशी बाजार उघडल्यावर शेअर बाजार तर धाडकन खाली कोसळला, पण सोन्या-चांदीचं काय? , आज किती आहेत दर? घेऊया जाणून..
सकाळी सकाळी शेअर बाजार कोसळल्याने आज अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. तर सोन्याच्या आणि चांदीच्या दरांबद्दलही जाणून घेण्यास लोकं उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी आजची सकाळ खुशखबर घेऊन आली आहे. आज देशभरात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदी दोन्हीही कमकुवत झाले. सोमवार सकाळच्या अपडेटनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे १,६०,९०० रुपये होता, तर चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम २,६५ ,३९० इतका होता. डॉलरची मजबूती, अमेरिकन बाँड उत्पन्नात वाढ, नफा बुकिंग, भू-राजकीय परिस्थितीत बदल आणि कमी औद्योगिक मागणी ही या घसरणीमागील मुख्य कारण असल्याचे बोललं जात आहे.
सोन्याच्या किमती कोसळल्या
आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या किमती अंदाजे ०.८५% म्हणजेच १३८० रुपयांनी घसरून १,६०,९०० रुपयांवर आल्या आहेत. दरम्यान, २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम अंदाजे १,४७,४९२ रुपयांवर नोंदली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कमकुवतपणा आणि डॉलरच्या हालचालीचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेतही जाणवला आहे.
चांदीही सुळक्कन खाली
चांदीच्या किमतीही घसरल्या. ९९९ फाइन सिल्व्हर ही भाव प्रति किलोग्रॅम २,६५,३९० रुपयांवर व्यवहार करत आहे. मागील दिवसाच्या तुलनेत अंदाजे १.२९% किंवा ३८०० रुपयांनी हा रेट कमी आहे. एमसीएक्सवरही चांदी कमकुवत झाली.
सकाळी ९.१५ वाजता एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी सुमारे १,६०,३०० रुपयांवर होता, जो ०.८३ % कमी होता. चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम सुमारे २ ,६५ ,१०० रुपयांवर होता, जो १% पेक्षा जास्त होता.
का झाली घसरण ?
सोने आणि चांदीच्या किमतीत झालेली घट ही अनेक कारणांमुळे आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीसारख्या वस्तू महाग झाल्या आहेत. शिवाय, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून लवकरच व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा कमी होत चालली आहे आणि बाँड उत्पन्नात वाढ होत आहे, यामुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या व्याज नसलेल्या मालमत्तेपासून दूर जात आहेत.




