अजित पवारांच्या विमान अपघाताला पायलट सुमित कपूर कारणीभूत; सीआयडीच्या चौकशीत व्हिएसआर कंपनीच्या मालकाचा दावा

SHARE:

मुंबई – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांनी सीआयडीसमोर खळबळजनक दावा केलेला आहे. त्यांनी सीआयडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे कि अजित पवार यांच्या विमान अपघातासाठी पायलट सुमित कपूर याची चूक कारणीभूत आहे. जर या अपघातात माझी चूक असेल किंवा कंपनीच्या वतीने काही त्रुटी राहिली असेल, तर मला कठोर शिक्षा करा, असे व्ही.के सिंग यांनी सीआयडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

सीआयडीच्या पथकाने व्ही.के. सिंग यांची गेल्या तीन दिवसांपासून कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान सिंग यांनी अपघाताच्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती, याबाबत सविस्तर माहिती दिली. व्ही के सिंग यांनी आपल्या जबाबात स्पष्टपणे नमूद केले आहे की पायलट सुमित कपूर याच्याकडून झालेल्या चुकीमुळेच हा भीषण अपघात घडला असावा. या अपघात प्रकरणात जर माझी काही चूक असेल किंवा कंपनीच्या स्तरावर काही त्रुटी राहिली असेल, तर मला कठोर शिक्षा करा, असे सिंग यांनी सीआयडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

दुसरीकडे व्ही.के. सिंग यांनी सीआयडीला जबाबावर आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले कि अजितदादांच्या विमान अपघाताचा केवळ तपास सुरु असल्याचं सीआयडीकडून सांगण्यात येते. एएआयबीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या विश्वासार्हतेवर तर काय बोलावं हेच कळत नाही, कधी ब्लॅक बॉक्स जळाला म्हणून तर कधी डेटा रिकव्हर केला म्हणून बातम्या पेरल्या जातात. ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय रेकॉर्ड झालं हेच अद्याप बाहेर आलं नाही, तर मग अपघात झाल्यानंतर काही वेळेतच व्हीआरएस कंपनीचा मालक व्ही.के. सिंग याला कसं कळलं की पायलटची चूक आहे?, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. ते म्हणाले कि हा महाशय पायलटची चूक सांगून स्वतः मात्र मोकळा होत असल्याचा डाव दिसतोय. असं रोहित पवार म्हणाले.

व्हि.के सिंग यांच्या खळबळजनक दाव्यानंतर आता सीआयडी पायलट सुमित कपूरच्या भूमिकेची अधिक खोलात जाऊन चौकशी करणार आहे. तसेच सीआयडी आता या प्रकरणाच्या तांत्रिक बाजूंकडे अधिक लक्ष केंद्रित करत आहे. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्ड पुन्हा एकदा बारकाईने तपासले जात आहेत. सुरुवातीला हा अपघात केवळ नैसर्गिक आपत्ती किंवा खराब हवामानामुळे झाला असावा, असा अंदाज होता. मात्र, आता वैमानिकाचे मागील उड्डाण रेकॉर्ड्स, त्याची त्या दिवसाची मानसिक आणि शारीरिक स्थिती, तसेच विमानाचे मेंटेनन्स यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. उड्डाण करण्यापूर्वी विमानाला तांत्रिक परवानगी योग्य रितीने देण्यात आली होती का, याचाही शोध आता अधिकारी घेत आहेत.

दुसरीकडे याच प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील सनसनाटी दावा करत खळबळ उडवून दिली आहे. अमोल मिटकरी यांनी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्यावर गंभीर आरोप केलेत. व्ही. के. सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी सोमवारी या अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी माळी यांच्या आईची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मिटकरी म्हणाले कि काही वेळापूर्वी मी पिंकी माळीच्या आईला भेटलो तेव्हा त्यांनी मला एक ऑडिओ ऐकवली. या प्रकरणाबाबत पत्रकारांसमोर जाऊन बोलू नका, अशी धमकी पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. व्ही. के. सिंगचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, व्ही.के सिंग यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा