पुणे – दहावीचा गणिताचा पेपर लीक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात पुणे एसएससी बोर्डाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दहावीच्या परीक्षेआधीच गणिताच्या दोन्ही प्रश्नपत्रिका टेलिग्राम ग्रुपवर लीक झाल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणात ॲडमिन व ग्रुप सदस्यांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात दहावीच्या परीक्षेचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यात दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्य मंडळाने खुप प्रयत्न केले आहे.
मात्र त्यानंतरही राज्यात अनेक जिल्ह्यात कॉपीचे गैरप्रकार समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यात पेपर लीक केल्याचा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेतील पुण्यातील गंभीर प्रकार उघड झाला आहे. गणित भाग-१ आणि भाग-२ चे पेपर परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर पेपर लीक झाल्याचे समोर आले आहे.
गणित भाग-२ चा पेपर ३ दिवस आधीच ग्रुपवर टाकण्यात आल्याचे यात दिसले आहे. पुण्यातील बोर्डाने अधिकृत प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली आहे. तर दोन्ही पेपर एकच आहे, हे समजले आहे. या प्रकरणात पुणे एसएससी मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
टेलिग्राम ग्रुप ॲडमिन व सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात हा प्रकार घडल्याने शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे. मात्र बोर्डाचा पेपर परीक्षेपूर्वीच लीक कसा काय झाला? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणात अधिक तपास पोलिस करत आहेत.





