नवी दिल्ली – अमेरिका-इस्रायल आणि ईराण युद्धादरम्यान केंद्र सरकार तसेच अनेक राज्यातील सरकारे म्हणत आहेत कि त्यांच्याकडे गॅसचा साठा आहे, लोकांनी काळजी करू नये, तर दुसरीकडे लोकांना घरगूती गॅस मिळून राहिलेला नाही. देशभरात अनेक ठिकाणी गॅससाठी लोकांचा रांगा पाहायला मिळत आहेत. या दरम्यान केंद्र सरकारने गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमात बदल केला आहे. नव्या नियमानुसार, ग्रामीण भागात आता ४५ दिवसांनंतरच तर शहरी भागात २५ दिवसानंतर एलपीजी सिलेंडर बुक करता येणार आहे, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत ही माहिती दिली.
यापूर्वी, केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरसाठी बुकिंग कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोलियम मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, घरगुती ग्राहक पूर्वी ५५ दिवसांच्या अंतराने सिलिंडर बुक करत असत, परंतु ग्रामीण भागात अफवांमुळे बुकिंगमध्ये अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे हा कालावधी १५ दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे एलपीजी पुरवठ्यावर दबाव वाढला आहे. म्हणूनच मंत्रालयाने बुकिंग कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
तरीही पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे कि घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचा पुरेसा पुरवठा आहे आणि लोकांना घाबरून सिलिंडर बुक करण्याची गरज नाही. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की घरगुती रिफायनरीजनी एलपीजी उत्पादन 25 टक्क्यांनी वाढवले आहे. शिवाय, होर्मुझ सामुद्रधुनीतून पुरवठा खंडित झाल्यानंतर भारताने नवीन स्त्रोतांकडून कच्च्या तेलाचे अधिग्रहण सुनिश्चित केले आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा म्हणाल्या कि आपण आपल्या एलपीजी गरजांपैकी सुमारे ६० टक्के आयात करतो. त्यापैकी सुमारे ९० टक्के एलपीजी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येते. परिस्थिती थोडी कठीण आहे, परंतु सरकार घरगुती ग्राहकांना पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्या पुढे म्हणाल्या कि आम्ही दररोज सुमारे ५० लाख सिलिंडर वितरित करतो. मात्र अफवांमुळे बुकिंग अनेक पटींनी वाढली आहे. राज्य सरकारांना लाभार्थ्यांच्या यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे जेणेकरून प्राधान्याने सिलिंडर वितरित करता येतील.
इराण युद्धामुळे भारतात गॅस आणि तेलाची टंचाई वाढत आहे. सर्वात मोठी चिंता एलपीजी पुरवठ्याची आहे. लोकांना घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर मिळविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. गॅस बुकिंगची घाई सुरू झाली आहे आणि काळाबाजार देखील सुरू झाला आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे कि त्यांनी सिलिंडरसाठी चार पट किंमत मोजली. गॅसच्या कमतरतेमुळे देशभरात अनेक रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि फूड स्टोअर्स बंद पडले आहेत. यामुळे लोकांच्या रोजगारावर संकट आले आहे.





