पुणे – पुण्यात पेपर फोडल्याचा खोटा बहाणा करून टेलिग्रामच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. पुणे पेपरफुटी प्रकरणात टेलिग्रामवरून ६०० रुपयांत पेपर विकला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करणार्या मुख्य आरोपीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राज्यभरात सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून खबरदारी घेतली जात आहे.
त्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉपीचे गैरप्रकार सुरू आहे. पुणे पेपरफुटी प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. पेपर फोडल्याचा बनाव करून टेलिग्रामच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करणारा मुख्य आरोपी चैतन्य शेंडे रा. चंद्रपूर याला पोलिसांनी अटक केली आहे. तो नर्सिंगचा विद्यार्थी आहे, अशी माहिती मिळाली आहे. माहितीनुसार चैतन्य शेंडे याने टेलिग्रामवर एक ग्रुप तयार केला होता.
या ग्रुपमध्ये एकूण २४५ विद्यार्थी सामील झाले होते. आगामी गणित विषयाचा पेपर आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. तो या ग्रुपमधील विद्यार्थ्यांशी संपर्क साधायचा. पेपर देण्यासाठी त्याने प्रत्येकी ६०० रुपये अशी किंमत ठरवली होती. विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करून तो त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने पैसे स्वीकारायचा. पैसे मिळताच त्या मूलांना ब्लॉक करायचा. चैतन्य शेंडेने अत्यंत चलाखीने विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. एखादा विद्यार्थी ६०० रुपये भरून पेपरची मागणी करायचा, तेव्हा त्याला पेपर देण्याऐवजी चैतन्य त्याला ग्रुपमधून आणि वैयक्तिक चॅटवरून ब्लॉक करून टाकायचा.
अशा प्रकारे त्याने शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. परीक्षेच्या तणावाखाली असलेले विद्यार्थी पेपर मिळवण्याच्या नादात या जाळ्यात अडकले आहेत. आणि त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. आरोपी नर्सिंगचा विद्यार्थी आहे. पोलीस तपासात ही धक्कादायक माहीती समोर आली आहे. आरोपी चैतन्य शेंडे हा स्वतः नर्सिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या या विद्यार्थ्याने गुन्हेगारीचा मार्ग का निवडला, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
या संपूर्ण रॅकेटमध्ये चैतन्यला आणखी कुणाची मदत लाभली आहे का? तसेच इतर कोणत्याही विषयाचे पेपर त्याने अशा प्रकारे विकले आहेत का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पुण्यात पेपर फुटल्याचा दावा खोटा ठरला आहे. तर पेपरच्या नावाखाली मूलांची आर्थिक फसवणूक झाली आहे. आरोपीने पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केला आहे. पुण्यात पेपर फुटलेला नाही. प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. आरोपी चैतन्य शेंडेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.





