मुंबई – सर्वात जास्त आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे, रोज शेतकरी आत्महत्या करत आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे हे विविध विषयांवर बोलले आहेत. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यांवर देखील राज ठाकरे बोलले आहेत. तसेच राज्यावर असणाऱ्या कर्जाच्या संदर्भात बोलताना राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्यावर २ लाख कोटींचे कर्ज झाले होते. आज ते कर्ज ११ लाख कोटींवर गेले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, विकास करत आहोत. महाराष्ट्राला ३ ट्रिलियनची इकॉनॉमी बनवायचे आहे असे बोलत आहेत. या राज्यात 3 वेळा कर्जमाफी झाली आहे, परंतु तरी पण सर्वात जास्त आत्महत्येचा आकडा महाराष्ट्र राज्यात आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहे. देशात महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत. राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यात कोस्टल रोड करत आहेत. तो रस्ता बाकीच्या राज्यातील लोकांना येण्यासाठी झाला आहे.
अडाणीसारखे उद्योगपती जमिनी घेत आहेत. आपण महाराष्ट्राची ओळख गमावून बसत आहोत. आपली भाषा गमावून बसत आहोत. भाषा संपली की अनेक देश जगातून सपंले आहेत. देशात आपल्याला आज करमणुकीमध्ये गुंतवून ठेवले जात आहे. आयपीएल, कुठले तरी पिक्चर आणि इतर माध्यमातून गुंतवून ठेवले जात आहे. त्यामुळे पहिल्यांदा इन्स्टाग्राममधून लोकांनी बाहेर पडण्याची गरज आहे. तुम्ही करमणुकीत गुंतून राहिला तर, राज्य सरकारला प्रश्न विचारू नये यासाठी हे सगळे राजकारण केले जात आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
ते नियोजित राजकारण आहे. हे फक्त भारतात नव्हे तर जगभरात असेच राजकारण सुरू आहे. देशातल्या सर्वसामान्य माणसांनी मोबाईलमध्ये, करमणुकीमध्ये अडकून राहावे, मग कुणीही विचार करणार नाही. या देशात पूर्वी लोक रस्त्यावर यायचे, पण आता मोबाईलवर निषेध व्यक्त केला जात आहे. माध्यमांची वाट लावून टाकली आहे. राज्य सरकारला विरोध केला तर जाहिराती बंद करू अशी धमकी दिली जात आहे. अशा विचित्र परिस्थितीमध्ये आपला भारत देश अडकला आहे. आणि राजकारणी खोटी आश्वासने देत फिरत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.





