खेळ : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना निकाल IPL २०२६ कोलकाता नाईट रायडर्सला अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात १९ व्या हंगामात एकूण आणि सलग दुसरा तर घरच्या मैदानात पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.
आयपीएल स्पर्धेच्या १९ व्या मोसमातील (IPL २०२६ ) सहाव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सवर एकतर्फी फरकाने मात करत विजयाचं खातं उघडलं आहे. हैदराबादने कोलकातासमोर २२७ धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. या विजयी धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाताला पूर्ण २० ओव्हरही खेळता आलं नाही. हैदराबादने केकेआरला १६ ओव्हरमध्ये १६१ रन्सवर गुडाळलं. हैदराबादने अशाप्रकारे हा सामना ६५ धावांनी जिंकला आणि पहिल्या पराभवानंतर आपल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. तर केकेआरला २०१२ नंतर पहिल्यांदा सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. केकेआर या मोसमात आतापर्यंत घरच्या मैदानात सामना गमावणारी पहिली टीम ठरली.
सामन्याचा आढावा
कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकून सनरायजर्स हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून २२६ धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादसाठी चौघांनी सर्वाधिक आणि स्फोटक खेळी केली. ट्रेव्हीस हेड याने ४६ धावांचं योगदान दिलं. तर अभिषेक शर्मा याने ४८ धावा केल्या. दोघांचं अर्धशतक अवघ्या काही धावांसाठी हुकलं. मात्र दोघांनी वैयक्तिक विक्रमाची पर्वा न करता टीमसाठी जास्तीत जास्त योगदान कसं देता येईल याचा विचार केला आणि फटकेबाजी केली.
ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याने निर्णायक योगदान दिलं. नितीशने २४ चेंडूत ३९ रन्स केल्या. कॅप्टन इशान किशन याने १४ धावा केल्या. तर हेन्रिक क्लासेन याने सर्वाधिक धावा केल्या. क्लासेनने ३५ चेंडूत ५२ धावांचं योगदान दिलं. केकेआरसाठी ब्लेसिंग मुजरबानी याने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. ब्लेसिंगने हैदराबादच्या ४ फलंदाजंना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
केकेआरचं २४ बॉलआधीच पॅकअप
केकेआरला २२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या, मोठ्या आणि वेगवान सुरुवातीची गरज होती. मात्र केकेआरला धावांच्या तुलनेत काही खास करता आलं नाही. हैदराबादने केकेआरला ठराविक अंतराने झटेक देत १६ ओव्हरमध्ये १६१ रन्सवर गुंडाळलं. केकेआरसाठी अंगकृष रघुवंशी याने सर्वाधिक धावा केल्या. अंगकृषने २९ बॉलमध्ये ५२ रन्स करुन आऊट झाला. अंगकृष रन आऊट झाला. उपकर्णधार रिंकु सिंग याने ३५ धावा जोडल्या. फिन एलन याने २८ रन्स केल्या. या व्यतिरिक्त एकालाही २० पार पोहचता आलं नाही. हैदराबादसाठी जयदेव उनाडकट याने तिघांना आऊट केलं. तर एशान मलिंगा आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी प्रत्येकी २ -२ विकेट्स मिळवल्या. तर हर्ष दुबे याने १ विकेट मिळवत इतरांना चांगली साथ दिली. बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान देणारा नितीश कुमार रेड्डी मॅन ऑफ द मॅच ठरला.





