ईडीकडून खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल; भोंदू अशोक खरात आणखी गोत्यात येण्याची शक्यता

SHARE:

मुंबई – आध्यात्माच्या नावाखाली शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात आणखी गोत्यात सापडला असून आता चौकशीचा फास आवळला आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात आता ईडीने भोंदू अशोक खरात विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे भोंदू अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. यापूवी अशोक खरात विरोधात १३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

भोंदू अशोक खरातवर केवळ महिलोंचे लैंगिक शोषण केल्याचाच नाही तर तर फसवणुकीच्या माध्यमातून कोट्यवधी माया जमवल्याचाही आरोप आहे. या आरोपानंतर ईडीने या प्रकरणात उडी घेतली असून खरात विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांनी जमा केलेली महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या ताब्यात देण्यात आली असून, खरातचे आर्थिक साम्राज्य नेमके कसे उभे राहिले, याचा तपास सुरू आहे. ईडीने अशोक खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्याने त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान अशोक खरातने एसआयटी चौकशीत महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली आहे. ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात, ती हातचलाखी असल्याचं अशोक खरातने मान्य केले. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असं म्हणत भोंदू अशोक खरातने एसआयटीच्या चौकशीत केलेल्या काळ्या कृत्याची कबुली दिली, अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान अशोक खरात याच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या दोन मोबाईलमध्ये व्हॉइस नोट्स, चॅट्स आणि ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांचे संकेत मिळाले आहेत. तपास यंत्रणांचाहवाला मार्गे पैशांची देवाणघेवाण सुरू असल्याचा संशय बळावला आहे.

तपासात असेही स्पष्ट झाले की मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून हे जाळे चालवले जात होते. या ठिकाणी दिवसाला २५ हजार रुपये भाड्याची खोली वर्षभरासाठी म्हणजेच ३६५ दिवसांसाठी बुक करण्यात आली होती. याच ठिकाणाहून अशोक खरात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

बांधकाम क्षेत्रातील काही व्यावसायिकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर व्यवहार केल्याचा संशय आहे. एका बिल्डरचा सुमारे ३०० कोटी रुपयांचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नाशिक आणि पुणे येथील किमान ५ जण या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे.

अशोक खरात या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या हाती मोठी माहिती लागली असून, एक वरिष्ठ महिला अधिकारी आता थेट तपास यंत्रणेच्या रडारवर आली आहे. नाशिकमध्ये कार्यरत असताना या महिला अधिकाऱ्याने खरातला प्रशासकीय मदत केल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तत्कालीन महिला अधिकाऱ्याने आणि अशोक खरातने एकमेकांना ’कथीत’ सहकार्य केल्याचे समोर येत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या महिला अधिकाऱ्याने प्रशासकीय पातळीवर खरातचे काम सुलभ केले आणि त्या बदल्यात अशोक खरातने आपले राजकीय व प्रशासकीय नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी पोस्टिंग मिळवून दिल्याची चर्चा सध्या नाशिकच्या वर्तुळात रंगली आहे. केवळ बदली आणि पोस्टिंगच नाही, तर या महिला अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत का? या दिशेनेही एसआयटीने आपला तपास चक्राकार फिरवला आहे. जर या व्यवहारांचे पुरावे सापडले, तर संबंधित महिला अधिकाऱ्याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

अधिक वाचा