दोन अल्पवयीन भाऊ-बहिणीचा शेततळ्यात बुडून मृत्यू; काही वर्षांपूर्वी वडिलांचा अपघातात झाला होता मृत्यू

SHARE:

सोलापूर – जिल्ह्यात दोन अल्पवयीन भाऊ-बहिणीचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात ही घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून २ अल्पवयीन सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर दक्षिण सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल परिसर येथे घडली आहे. श्रवण संतोषकुमार अंकलगी व श्रावणी संतोषकुमार अंकलगी असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन बहीण-भावाचे नाव आहे.

मृत्यू झालेल्या बहीण-भावाचे वडिल संतोषकुमार अंकलगी यांचा काही वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर आई उषा संतोषकुमार अंकलगी या दोन्ही मुलांबरोबर कारकल येथील शेतात राहत होते. रविवारी म्हणजेच १२ एप्रिल २०२६ रोजी उषा अंकलगी या कामानिमित्त सोलापूरला गेल्या होत्या. मुलगा श्रवण अंकलगी हा शाळेला सुट्टी असल्याने विंचूरवरून घरी कारकलला आला होता. दुपारी श्रवण अंकलगी आणि श्रावणी अंकलगी शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते.

यावेळी शेततळ्यातून बाहेर पडता यावे यासाठी त्या अल्पवयीन मुलांनी झाडाला दोरी बांधून ती कमरेला बांधली होती. मात्र, झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि दोघेजण पाण्यात बुडू लागले. पण, त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी कोणीच नव्हते. त्यामुळे दोन्ही अल्पवयीन मुले शेततळ्यातील पाण्यात बुडनू मृत्यू झाला आहे. शेताकडे गेलेली नात, नातू शेततळ्यात जाऊन खूप वेळ झाले तरी त्याचा पोहण्याचा आवाज येत नसल्याने आजी महादेवी कोळी शेततळ्यांकडे गेल्या असता श्रवण अंकलगी आणि श्रावणी अंकलगी पाण्यात बुडाल्याचे दिसले आहे.

आजीने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून शेजारील विद्यानंद वालीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शेजारील मल्लिकार्जुन सोनगी, महादेव कांबळे आणि वालीकर या तिघांनी शेततळ्यात उडी घेऊन श्रवण अंकलगी व श्रावणी अंकलगी यांना शेततळ्यातील पाण्यातून बाहेर बाहेर काढले आहे. या घटनेत पाण्यातून बाहेर काढल्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुले बेशुद्धावस्थेत आढळून आले आहेत. त्या दोघांना उपचारासाठी मंद्रप ग्रामीण रुग्णालयात नेले होते.

तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासल्यावर मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याचा अधिक तपास पोलिस हवालदार विट्ठल बिराजदार हे करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या या घटनेमुळे अंकलगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वर्षांपूर्वीच या अल्पवयीन मुलांच्या वडिलांचे अपघाती मृत्यू झाला होता. वडील नसल्यामुळे आई आणि आजीने मोठ्या कष्टाने या दोन्ही मुलांचा सांभाळ केला होता. मात्र, दोन्ही मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामूळे दक्षिण सोलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात अधिक तपास दक्षिण सोलापूर पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा