डोक्यात हवा गेलेल्या मंत्र्यांना घरी पाठवा; एकनाथ शिंदेला आमदार संतोष बांगर यांचा घरचा आहेर

SHARE:

नांदेड – काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ते उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम करत आहेत. कार्यकर्त्यांचे फोन ते उचलत नाहीत. अशा मंत्र्यांना घरी पाठवा, अशी टीका शिंदे सेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर केली आहे. नांदेड शहरात पार पडलेल्या शिंदे गटाच्या तीन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत आमदार संतोष बांगर यांनी ही टीका केली. बांगर यांच्या या टीकेमुळे शिंदे गटातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे.

नांदेड शहरात पार पडलेल्या शिंदे गटाच्या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री उदय सामंत उपस्थित होते. मात्र, या बैठकीतच आमदार संतोष बांगर यांनी उघडपणे आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ते उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत. डोक्यात हवा गेलेल्या मंत्र्यांना घरी बसवा, अशा शब्दांत त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर शाब्दिक हल्ला चढवला.

या बैठकीत आमदार संतोष बांगर म्हणाले कि निधी वाटपात अन्याय होत आहे, कामे मिळत नसून त्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागतो. मंत्री फोन उचलत नाही. मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. अशा मंत्र्यांना आधी घरी बसवा, त्यांना घरचा रस्ता दाखवा, अशी मागणी बांगर यांनी केली. त्यांनी ही मागणी खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री उदय सामंत यांच्या समोरच केली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

सध्या मराठवाड्यातील काही ठिकाणी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे दिसून येते. धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. तर इतर जिल्ह्यातीलही नेत्यांमधील विसंवाद आणि कार्यकर्त्यांची नाराजी उघड झाली आहे. जाहिररीत्या ही नाराजी समोर येत आहे. यावर पक्षाने वेळीच काही धोरण ठरवले नाही तर अंतर्गत वाद वाढून गटबाजीने पक्षाला फटका बसण्याची भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा