नवी दिल्ली – कांग्रेसेचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुहेरी नागरिकत्व प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने राहुल गांधी यांच्या विरोधात रायबरेली येथे एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण त्यांच्या ब्रिटिश नागरिकत्वाशी संबंधित आहे.
कर्नाटकातील भाजप नेते विग्नेश शिशिर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात एक याचिका दाखल करून राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे, त्यांच्यावर ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा आरोप आहे. आरोप असा आहे की राहुल गांधी यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजेच, ते एकीकडे भारतीय नागरिक आहेत आणि दुसरीकडे ब्रिटिश नागरिक आहेत. भारतीय कायद्यानुसार, एक व्यक्ती केवळ एकाच देशाचे नागरिकत्व धारण करू शकते. जर एखाद्या व्यक्तीकडे दुहेरी नागरिकत्व असेल, तर ती व्यक्ती भारतात निवडणूक लढवू शकत नाही किंवा खासदार होऊ शकत नाही.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडून आले. यानंतर, विग्नेश शिशिर यांनी न्यायालयात एक याचिका दाखल करून असा युक्तिवाद केला की जर राहुल गांधींकडे ब्रिटिश नागरिकत्व असेल, तर त्यांचे संसद सदस्यत्व बेकायदेशीर आहे. जस्टिस सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी घेतली आणि एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने रायबरेली पोलीस ठाण्याला राहुल गांधींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. इतकेच नाही, तर तपास सीबीआयकडे सोपवण्याची उत्तर प्रदेश सरकारची मागणीही न्यायालयाने मान्य केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने असा निकाल दिला आहे की राज्य सरकारने एकतर स्वतः चौकशी करावी किंवा हे प्रकरण केंद्रीय यंत्रणेकडे सोपवावे, परंतु हे आरोप चौकशीच्या अधीन असतील. रायबरेली सत्र न्यायालयाने हे प्रकरण फेटाळल्यानंतर विग्नेश शिशिर उच्च न्यायालयात पोहोचले होते.
आपल्या निवेदनात, विग्नेश शिशिर यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना या प्रकरणाशी संबंधित अत्यंत गोपनीय फायली न्यायालयासमोर सादर करण्याची परवानगी दिली. त्यांचा दावा आहे की याच फायलींमुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करेल. एफआयआर दाखल झाल्यानंतर राहुल गांधींकडे खरोखरच ब्रिटिश नागरिकत्व आहे की नाही, हे तपास यंत्रणा निश्चित करेल.




