मराठी सक्तीच्या विषयावर शिवसेनेत दोन गट; माजी खासदार संजय निरुपम यांचे परिवहन मंत्र्यांना पत्र

SHARE:

मुंबई – राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं सक्तीचं करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. या निर्णयाची येत्या 1 मेपासून अंमलबजावणी करण्याचे आदेशही सरनाईक यांनी दिले आहेत. यावरून आता शिवसेनेतच वाद उफळून आला आहे. शिंदे सेनेचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी रिक्षा चालकांसाठीच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला कडाडून विरोध करत थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

शिंदेसेनेचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती केली आहे. तर दुसरीकडे याच पक्षाचे दिग्गज नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी मराठी सक्तीवर फेरविचार करण्याचं पत्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवलं आहे. पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे कि महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे, पासून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा घेतलेला निर्णय अनेक कष्टकरी चालकांच्या मनात भीती, संभ्रम आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करणारा ठरत आहे.

मराठी भाषेचा सन्मान आणि तिचं जतन हे आपल्या प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेलं आहे, याबाबत कोणतेही दुमत नाही. मात्र, भाषेच्या प्रेमाला सक्तीची चौकट घालणे आणि त्यासाठी परीक्षा लादणे, हे हजारो कष्टकरी चालकांच्या जगण्यावर आघात करणारे ठरू शकते.
मुंबईसारख्या महानगरात सुमारे 70 टक्क्यांहून अधिक रिक्षा व टॅक्सी चालक हे देशातील विविध भागांतून येथे आलेले आहेत. ते आपल्या कष्टाने या शहरात स्थान निर्माण करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे आणि मुंबईच्या गतिमान जीवनशैलीला चालना देत आहे. अशा वेळी या निर्णयामुळे त्यांच्या रोजगारावर टांगती तलवार निर्माण होत आहे. त्यांच्या मनात भीती आणि असंतोष वाढत आहे. आणि मुंबईच्या दैनंदिन वाहतूक व्यवस्थेलाही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

माझ्याकडे अनेक चालकांचे फोन येत असून, त्यांच्या व्यथा ऐकताना मन अक्षरशः हेलावून जाते, त्यांच्या डोळ्यातील असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची चिंता ही अत्यंत वेदनादायी आहे. याकरिता माझी आपणास विनंती आहे की, मराठी भाषेचा सन्मान अबाधित ठेवत. तुटक, कामचलाऊ मराठी समजणाऱ्या व बोलणाऱ्या चालकांना सवलत देण्यात यावी आणि भाषा सक्ती व परीक्षा घेण्याचा निर्णय फेरविचार करून मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.

जर सरकारने मराठी भाषेच्या सक्तीसंदर्भातला निर्णय बदलला नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, असा इशाराही निरुपम यांनी दिला. दरम्यान आता शिंदे सेनेचे दिग्गज संजय निरुपम सारख्या नेत्यानंही मराठी सक्तीला विरोध दर्शवल्यामुळे मंत्री सरनाईक आणि महायुती सरकार मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधावर ठाम राहणार कि फेरविचार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Comment