शिवरायांचा अवमान होत असताना फडणवीसांनी धिरेंद्र शास्त्रीला रोखायला हवं होतं; खासदार संजय राऊतांची प्रखर टीका

SHARE:

मुंबई – छत्रपती शिवाजी हे आपल्या ऊर्जेचा अखंड प्रवाह आहेत. ते कधी थकले नाहीत आणि कधी झुकले नाहीत. मात्र, सध्या काही बुवा महाराष्ट्रात येऊन इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतायत, हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. शिवरायांचा अवमान होत असताना फडणवीसांनी बागेश्वर बाबांना रोखायला हवं होतं, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले कि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत मंचावर उपस्थित होते. तेथे शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड केली जात होती. अशा प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत शिवरायांचा अपमान होत असताना त्यांनी धीरेंद्र शास्त्रीला रोखायला हवं होतं. हे विधान जाणीवपूर्वक केलं जातंय, असा आरोप राऊत यांनी केला.

नागपूर येथे एका आरएसएसच्या कार्यक्रमात पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाला कि छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले व ते रामदास स्वामींकडे गेले. आता मला जास्त लढायचे नाही व हे मुकूट व सत्ता तुम्ही सांभाळा, असे ते त्यांना म्हणाले. रामदास स्वामी त्यांना म्हणाले की ठीक आहे. मात्र शिष्याचे कर्तव्य हे गुरूच्या आदेशांचे पालन करणे हे आहे. त्यामुळे आता माझी ही सत्ता तुम्ही सांभाळावी, असे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले. धीरेंद्र शास्त्रीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्या या वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले कि शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल असा इशारा त्यांनी दिला. तर नागपूर येथील भोसले राजघराण्यातील राजे मुधोजी भोसले यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार निशाना साधला छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात चुकीचे वक्तव्य खपवून घेणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली.

धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्याविरोधात मराठा मावळा संघटनेने शनिवारी छत्रपती संभाजी नगररातील सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बाबांनी मांडलेला इतिहास हा शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा असून, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. जर पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल केला नाही, तर शहरात आणि जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

सोलापुरातील चार हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने धीरेंद्र शास्त्रीच्या प्रतिमेस शेणाच्या अभिषेक घालून निषेध करण्यात आला. साधू बुवांनी आपल्या मठात अध्यात्मचे काम करीत बसावे, समाजामध्ये, जाती धर्ममध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरू असून अशा ढोंगी साधू बुवांना महाराष्ट्र सरकारचे पाठबळ मिळत आहे, इतिहासाचे ज्ञान नसताना इतिहास संशोधक होण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने अशा बुवा साधूना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.

धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यात गुरू शिष्याचे नाते होते असे धादांत खोटे विधान केले. यावेळी उपस्थित असलेले सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पत्रपरिषदेत केली.

Leave a Comment

अधिक वाचा