नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील सात खासदारांनी भाजपात प्रवेश घेतला, यामध्ये क्रिकेटर हरभजन सिंग यांचाही समावेश आहे. या प्रकरणात हरभजन सिंग यांना मोठा झटका लागला आहे. एकीकडे आपच्या कार्यकर्त्यांनी हरभजन सिंग यांच्या घरावर ‘पंजाबचा गद्दार’ असं लिहीलं तर दुसरीकडे पंजाबच्या भगवंत मान सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. हरभजन सिंग यांच्या घराबाहेर तैनात असलेले सुमारे नऊ ते दहा सुरक्षा कर्मचारी हटवण्यात आले असून त्यांना देण्यात आलेली सरकारी पायलट कारही परत घेण्यात आली आहे. हरभजन सिंग यांचे खासगी सहायक मनदीप सिंह यांनीच माहिती दिली आहे.
नुकतचं आम आदमी मोठा राजकीय भूकंप झाला. पक्षाच्या राज्यसभेतील सात खासदारांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये माजी किक्रेटपटू हरभजन सिंग यांचाही समावेश आहे. हरभजन सिंग यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयानंतर आता पंजाब सरकारनेही त्यांना जोरदार झटका दिला आहे. सरकारने त्यांना पुरविलेली सुरक्षा काढून घेतली आहे. त्यांच्या घराबाहेर सुरक्षारक्षकही हटविले आहेत. तर एका दिवसांपूर्वी हजरभजन सिंग यांच्या घराबाहेर काळ्या शाईने ‘पंजाबचा गद्दार’ असे शब्द लिहिण्यात आले होते.
याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये काही लोक काळ्या स्प्रे पेंटने गद्दार असे लिहित आहेत. जवळच पोलीस उभे असूनही, त्यांना हटवण्यासाठी ते कोणताही विशेष प्रयत्न करत असल्याचे दिसत नाही. याशिवाय अशोक मित्तल यांच्याशी संबंधित असलेल्या फागवाडा येथील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारावरही आक्षेपार्ह घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.
शनिवारीच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केले होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांना गद्दार संबोधून त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चंदीगडमध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान ते म्हणाले की या नेत्यांनी केवळ पक्षाचाच नव्हे, तर पंजाबच्या लोकांचाही विश्वासघात केला आहे.
भगवंत मान यांनी आरोप केला की, भाजपला पंजाब आणि पंजाबी लोकांशी समस्या आहे. त्यांच्या मते, पंजाबच्या लोकांच्या हिताच्या कोणत्याही गोष्टीत भाजप अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो. मान म्हणाले की आम आदमी पक्ष कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा मोठा आहे आणि काही लोकांच्या जाण्याने पक्षावर किंवा पंजाबच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की पंजाबमध्ये राजकीय पाठिंब्याच्या अभावामुळे भाजप पक्षांतराचे राजकारण करत आहे. भाजप आम आदमी पक्षाला तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी भीती, लोभ आणि दबावाचे डावपेच वापरत आहे. पंजाबमध्ये धर्मभ्रष्टतेविरोधात कठोर कायदे लागू झाल्यापासून भाजपची अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे.






