मंत्री प्रताप सरनाईक यांनी भोईर कुटुंबाची जागा बळकवली; भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा गंभीर आरोप

SHARE:

मुबई – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यात राजकीय वाद कमी होण्याऐवजी आणखीनच तीव्र झाला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या समर्थकांवर भाईंदर पाडा येथील भोईर कुटुंबाच्या मालकीची सुमारे १,२१९चौरस मीटर जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी सरनाईक यांच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मिरा भाईंदरमध्ये जमिनीच्या वादावरून मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे. कासारवडवली येथील भाईंदरपाड्यातील भोईर कुटुंबाच्या मालकीची १२१९ चौरस मीटर जमीन सरनाईकांनी बळकाविल्याचा आरोप आमदार मेहता यांनी केला. भोईर कुटुंबाच्या एकूण २,४३९ चौरस मीटर जागेपैकी निम्म्याहून अधिक जागेवर अतिक्रमण करून ती हडपल्याचा आरोप आमदार मेहता यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे सरनाईक गोत्यात सापडले आहेत.

सरनाईक हे भूमिपुत्रांच्या जमिनी जबरदस्तीने लाटत असून अशा कामांमुळे ते सरकारची प्रतिमा मालिन करत आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले आहे.

या गंभीर प्रकरणाविरोधात आज नरेंद्र मेहता यांनी आपले कार्यकर्ते, नगरसेवक आणि महापौरांसह कासारवडवली पोलीस ठाणे येथे भेट देत भोईर कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली आहे. मेहता यांनी संबंधित जागेलाही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली.

यापूर्वी मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जागा हडपल्या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून, चौकशी सेल नेमणार असल्याचं देखील सांगितले होतं. आता नरेंद्र मेहता यांनी मंत्री सरनाईकांवर भोईर कुटुंबाची जागा बळकवल्याचा आरोप केला आहे. मेहतांच्या या आरोपांमुळे मिरा भाईंदरमधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून महायूतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Leave a Comment