जनगणना कर्तव्यावर असलेल्या दोन शिक्षकांचा उष्माघाताने मृत्यू; दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू

SHARE:

ओडिशा – जनगणनेचे काम करत असताना दोन शालेय शिक्षकांचा दोन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये उष्माघाताने मृत्यू झाला, या घटना मयूरभंज आणि सुंदरगड जिल्ह्यांमध्ये घडल्या, जिथे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या वर गेले होते. राज्यातील ही तिसरी अशी घटना आहे.

मयूरभंज जिल्ह्यातील बेटनाटी येथील वृत्तानुसार, बेटनाटी ब्लॉकमधील बैद्यनाथ हायस्कूलचे शिक्षक राजकापूर हेंब्रम यांचा रविवारी संध्याकाळी बारीपाडा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे भाचे, लक्ष्मीकांत हेंब्रम यांनी सांगितले की जनगणनेसाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून परतल्यानंतर ते बेशुद्ध पडले आणि त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका ममता दास म्हणाल्या कि जनगणनेच्या कामावरून परतल्यानंतर राजकापूर हेंब्रम यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला. मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, आजारी असूनही जनगणनेचे काम सुरू ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून आपल्यावर दबाव येत असल्याची माहिती त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आधीच दिली होती.

सुंदरगड जिल्ह्यातील आणखी एका वृत्तानुसार, गुरुंडिया ब्लॉकमधील जारडा शासकीय उच्च प्राथमिक विद्यालयातील शिक्षक अनुराग एक्का हे देखील शनिवारी जनगणनेच्या कामावर असताना आजारी पडले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना सुरुवातीला गुरुंडिया सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्रकृती खालावल्यानंतर जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

यापूर्वी, सोनापूर जिल्ह्यातील एका जनगणना गणकाचा जनगणनेच्या कामावरून परतल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, असे २१  एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका अधिकृत पत्रात म्हटले आहे. राज्य सरकारने उष्ण आणि दमट हवामानात काम करणाऱ्या जनगणना अधिकाऱ्यांसाठी एक आदेश जारी केला आहे. वाढत्या तापमानामुळे, त्यांना सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Comment