राघव चड्ढासोबत ‘आप’ सोडून भाजप गेलेले खासदार संदीप पाठक गोत्यात; दोन गुन्हे दाखल, कधीही अटक होण्याची शक्यता

SHARE:

नवी दिल्ली – गेल्या महिन्यात राघव चड्ढा यांच्यासोबत आम आदमी पक्षाच्या (आप) ७ खासदारांनी भाजपात प्रवेश केला. दल बदल कायद्यांतर्गत अपात्रतेची लटकती तलवार कायम असताना आता यातील एक खासदार संदिप पाठक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खासदार संदीप पाठक यांच्यावर पंजाबमध्ये २ अजामीनपात्र गुन्हे दाखल झाले असून त्यांना कधीही अटक केली जाऊ शकते.

२५ एप्रिल रोजी संदीप पाठक यांनी खासदार राघव चड्ढा यांच्यासह इतर नेत्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने दिल्लीच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला होता. राघव चड्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, विक्रमजीत साहनी, राजेंद्र गुप्ता आणि स्वाती मालीवाल या आपच्या राज्यसभा खासदारांनी भाजपात प्रवेश केला होता. सामूहिक पक्षांतरामुळे राजकीय वातावरण आधीच तापले असताना या कारवाईने ते अधिकच तीव्र केले आहे.

सूत्रांनुसार, पंजाब पोलिसांनी राज्यसभेचे खासदार संदीप पाठक यांच्या विरोधात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये २ अजामीनपात्र गुन्हे दाखल केले आहेत. महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे आरोपाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संदीप पाठक यांना अटक करण्यासाठी पंजाब पोलीस त्यांच्या घरीही पोहोचले होते. परंतू अधिकारी पोहोचण्यापूर्वीच ते निघून गेले होते. आता त्यांना कधीही अटक केली जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी आपला सोडून भाजपात गेलेले राज्यसभा खासदार आणि उद्योगपती राजिंदर गुप्ता यांच्या बरनाला येथील ट्रायडंट इंडस्ट्रीजच्या युनिटवर पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाने (पीपीसीबी) छापा टाकला. ज्यानंतर कंपनीने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला नोटीस बजावली. पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयाला आश्वासन दिले आहे की ४ मे पर्यंत कंपनीवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. एकीकडे संदीप पाठक यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा आणि त्यांच्या अटकेची शक्यता, तर दुसरीकडे उद्योगपतीवरील कारवाई, यामुळे पंजाब आणि राष्ट्रीय राजकारणातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा