मुख्यमंत्री भगवंत मान मद्य प्राशन करून आले; विरोधी पक्षाच्या आरोपाने विधानसभेत गदारोळ

SHARE:

पंजाब – शुक्रवारी पंजाबच्या विधानसभेत मोठा गदारोळ माजला. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर मद्य प्राशन करून विधानसभेत येण्याचा आरोप केला. विरोधी पक्षांचा आरोप आहे कि मुख्यमंत्री दारू पिऊन विधानसभेत पोहोचले आणि भाषण देऊ लागले. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी गोंधळ घातला आणि सभात्याग केला. तसंच विधानसभेबाहेर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. विरोधी पक्ष, शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) मुख्यमंत्री भगवंत मान यांचा एक व्हिडिओ जारी केला आहे.

व्हिडिओचा संदर्भ देत अकाली दलाने म्हटले आहे की ही शरमेची बाब आहे की मुख्यमंत्री भगवंत मान आज कामगार दिनानिमित्त दारू पिऊन विधानसभेच्या पवित्र सभागृहात पोहोचले. मुख्यमंत्री विधानसभेत कसे वागत आहेत, हे तुम्ही स्वतःच पाहू शकता. पक्ष मुख्यमंत्र्यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध करतो. दारू पिऊन त्यांनी आज विधानसभेत प्रवेश करायला नको होता. शिरोमणी अकाली दलाची मागणी आहे की, आज संपूर्ण पंजाबसमोर मुख्यमंत्र्यांची डोप टेस्ट करण्यात यावी, जेणेकरून पंजाबच्या जनतेला सत्य कळेल.

पंजाबचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी सर्व आमदारांची अल्कोहोल मीटर चाचणी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, एका काँग्रेस आमदाराने राज्यप्रमुखांवर दारू पिऊन विधानसभेत आल्याचा आरोप केला आहे आणि त्यामुळे सर्व आमदारांची अल्कोहोल डोप चाचणी केली पाहिजे. काँग्रेसने आरोप केला आहे की, पंजाबचे मुख्यमंत्री दारूच्या नशेत विधानसभेत आले होते. त्यामुळे सर्व आमदारांची अल्कोहोल डोप चाचणी केली पाहिजे. ते म्हणाले की राज्यप्रमुखांवर गंभीर आरोप झाल्यामुळे सत्यता पडताळण्यासाठी प्रत्येक आमदाराची तपासणी झाली पाहिजे.

विधानसभेतील गदारोळावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की हे विशेष अधिवेशन कामगार दिनाला समर्पित आहे आणि त्यांनी सर्व सदस्यांना वाद टाळून सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचे आवाहन केले. दरम्यान, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमधील किमान वेतनात 15 टक्के वाढ जाहीर केली. ही वाढ शासकीय आणि गैर-सरकारी दोन्ही क्षेत्रांना लागू होईल. मान म्हणाले की कामगार दिनानिमित्त विधानसभेचे अधिवेशन सकारात्मक वातावरणात सुरू झाले, परंतु काँग्रेस पक्ष नेहमीच सभात्याग करण्यासाठी निमित्तं शोधतो. किमान वेतन 2013 मध्ये वाढवण्यात आले होते. त्यानंतर त्यात कोणतीही वाढ झालेली नाही.

Leave a Comment

अधिक वाचा