रोहित जैन यांच्याकडे रिजर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदाची धुरा; आजपासून नव्या प्रवासाला सुरुवात

SHARE:

नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये मोठा प्रशासकीय बदल झाला आहे. केंद्र सरकारने रोहित जैन यांची रिझर्व्ह बँकेचे नवे ‘डेप्युटी गव्हर्नर’ म्हणून नियुक्ती केली असून, ते पुढील तीन वर्षांसाठी ही जबाबदारी सांभाळतील. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, जैन ३ मे किंवा त्यानंतर आपला पदभार स्वीकारतील.

टी. रबी शंकर यांची घेणार जागा –

रोहित जैन हे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी. रवी शंकर यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ आता संपत आहे. रवी शंकर यांच्याकडे असलेले महत्त्वपूर्ण विभाग, जसे की वित्तीय बाजार नियमन (Financial Markets Regulation), परकीय चलन (Foreign Exchange) आणि पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स, आता जैन यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.

बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव –

रोहित जैन यांना बँकिंग क्षेत्रातील सुमारे तीन दशकांचा (३० वर्षे) दांडगा अनुभव आहे. या प्रवासात त्यांनी आरबीआयमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. डिसेंबर २०२० पासून ते कार्यकारी संचालक (Executive Director) या पदावर कार्यरत होते. त्यांनी देखरेख (Supervision), जोखीम विश्लेषण आणि व्हल्नरेबिलिटी असेसमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी रिझर्व्ह बँकेत देखरेख, मानव संसाधन व्यवस्थापन (HRM) आणि अन्य महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे.

शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य –

रोहित जैन यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत मजबूत आहे. त्यांनी कॉमर्समध्ये मास्टर्स आणि एमबीए (MBA) पदवी पूर्ण केली आहे. त्यांच्याकडे बँकिंग आणि फायनान्सशी संबंधित अनेक आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे आहेत, ज्यामध्ये CAIIB, ‘इंटरनॅशनल सर्टिफिकेट इन बँकिंग रिस्क अँड रेग्युलेशन’ आणि ‘सर्टिफाइड बँक ट्रेनर’ यांचा समावेश आहे.

आरबीआयमधील डेप्युटी गव्हर्नरचे समीकरण –

रिझर्व्ह बँकेत एकूण चार डेप्युटी गव्हर्नर असतात. त्यापैकी दोन पदे बँकेच्या अंतर्गत अनुभवावरून (प्रमोशनद्वारे) भरली जातात, तर दोन पदे बाहेरील तज्ज्ञांसाठी असतात.

अंतर्गत नियुक्ती मध्ये रोहित जैन आणि एस. सी. मुर्मू (ज्यांची नियुक्ती ऑक्टोबर २०२५ मध्ये झाली होती) यांचा समावेश आहे तर बाह्य नियुक्तीमध्ये प्रख्यात अर्थतज्ज्ञ पूनम गुप्ता आणि व्यावसायिक बँकर स्वामीनाथन जे. हे आहेत.

गेल्या महिन्यात सरकारने या पदासाठी चार कार्यकारी संचालकांच्या मुलाखती घेतल्या होत्या, ज्यामध्ये रोहित जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. रिझर्व्ह बँक लवकरच त्यांच्याकडे सोपवण्यात येणाऱ्या विभागांची अधिकृत घोषणा करेल.

Leave a Comment