पुणे – विनायक सावरकर यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारकडे पाच वेळा दयेचे अर्ज दाखल केले होते आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश सैन्यात भरतीसाठी अपीलही केली होती, अशी कबूली विनायक दामोधर सावरकर यांचे पणतू सत्यकी सावरकर यांनी पुण्यातील विशेष एमी/एमएलए न्यायालयासमोर दिली. लंडनमधील एका भाषणात सावरकरांची बदनामी केल्याच्या आरोपात सत्यकी सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान त्यांनी दिलेल्या साक्षमधून ही बाब मान्य केली.
लाईव लॉच्या अनुसार, सत्यकी यांनी त्यांच्या उलटतपासणीत सांगितले, हे खरे आहे की सावरकरांनी सेल्युलर जेलमध्ये असताना पाच दयेच्या याचिका दाखल केल्या होत्या. केवळ सावरकरांनीच नव्हे तर इतर अनेक राजकीय कैद्यांनीही ब्रिटिश सरकारला अशाच प्रकारच्या याचिका पाठवल्या होत्या. काही इतिहासकारांच्या मते, सावरकरांवर द्वि-राष्ट्र सिद्धांत मांडल्याचा आरोप आहे, हे खरे नाही. सावरकरांनी द्वि-राष्ट्र सिद्धांताविषयी वस्तुनिष्ठ निरीक्षणे नोंदवली होती, परंतु मूळ कल्पना त्यांची नव्हती, ती सर सय्यद अहमद खान यांनी मांडली होती. गाय हा एक उपयुक्त प्राणी आहे, देव नाही, हे सावरकरांचे मत नमूद केले गेले होते, हेही खरे आहे.
राहूल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी केलेल्या उलटतपासणीदरम्यान, सत्यकी यांनी कबूल केले की महात्मा गांधी हत्या प्रकरणात निर्दाेष सुटलेल्या सावरकरांनीही तत्कालीन ब्रिटिश सरकारकडे ब्रिटिश सैन्यात भरतीसाठी अर्ज केला होता. त्यांनी सावरकरांच्या अर्जामागील कारणही स्पष्ट केले.
सत्यकी म्हणाले कि दुसऱ्या महायुद्धादरम्यान सावरकरांनी ब्रिटिश सैन्यात भरतीसाठी अर्ज केला होता, असे म्हणणे योग्य नाही. हा आरोप नसून एक आक्षेप आहे. सावरकरांची भूमिका न समजता असे आक्षेप घेतले जातात. तत्कालीन भारतीय सैन्यात सामील करून तरुणांना लष्करी प्रशिक्षण, शस्त्र प्रशिक्षण आणि विविध पदांवरील अनुभव देणे हा यामागील उद्देश होता, जेणेकरून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी स्वतःचे सशस्त्र दल असेल. सावरकरांच्या दूरदृष्टीमुळेच स्वातंत्र्यानंतर लगेचच जेव्हा पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, तेव्हा प्रशिक्षित भारतीय सैनिकांच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला.
सत्यकी यांनी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांसारख्या इतर क्रांतिकारकांपेक्षा सावरकरांना अधिक सन्मान का दिला जातो, या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. ते म्हणाले कि वादविवाद आणि मतभेद हे प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनाचा भाग असतात. राष्ट्रीय अभिमानाला प्रोत्साहन देणे हे भारत सरकारचे काम आहे. सावरकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तत्सम विचारसरणीच्या राजकीय पक्षांचे वैचारिक प्रेरणास्थान आहेत का, या प्रश्नावर सत्यकी म्हणाले की आरएसएस आणि तत्सम राजकीय पक्ष कोणाला आपले वैचारिक प्रेरणास्थान मानतात, याची त्यांना माहिती नाही. संसदेत केवळ सावरकरांचेच तैलचित्र का लावण्यात आले, या प्रश्नाला उत्तर देताना सात्यकी म्हणाले की, या संदर्भात निर्णय घेणे हे भारत सरकारच्या अधिकारक्षेत्रात येते.
सत्यकी म्हणाले कि सावरकरांच्या गायी किंवा लष्करी भरतीच्या मुद्द्यांवरील मतांवर जे आक्षेप घेतले गेले, ते त्यांची भूमिका पूर्णपणे न समजता घेण्यात आले होते. ज्यांना या बाबींवर आक्षेप आहे, त्यांनी प्रथम सावरकरांची सर्व मते वाचावीत, अशी माझी इच्छा आहे. काही खास विचारसरणीच्या लोकांकडून सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीसंदर्भात सात्यकी म्हणाले की अशा पुरस्काराची मागणी करणाऱ्या व्यक्तींबद्दल त्यांना माहिती नव्हती. त्यांनी पुढे असेही सांगितले की या संदर्भात निर्णय भारत सरकार घेते.






