१५०० च्या बदल्यात लाडकींच्या मुलीवर अत्याचार करण्याचा अधिकार दिलाय का?; खासदार संजय राऊत यांचा सरकारला सवाल

SHARE:

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महिलांसह अल्पवीयन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान अशीच एक घटना नसरापूर येथे घडली. येथे चार वर्षांच्या लहान मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणावरून शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारवर घाणाघाती टीका केली आहे. १५०० रूपयांच्या बदल्यात लाडक्या बहिणींच्या मुलीवर अत्याचार करण्याचा अधिकार दिला आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी फडणवीस सरकारला केला आहे. ते रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

खासदार संजय राऊत म्हणाले कि काल मिसिंग लिंक रस्त्याच्या उद्घाटनावेळी ट्राफिक जाममुळे लोकांचे हाल झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लोकांची माफी मागितली. नरसापूर प्रकरणाबद्दल खरंतर त्यांनी माफी मागायला हवी. मुलींवरील अत्याचार, महिलांवरील अत्याचारासंदर्भात त्यांनी एकदा तरी माफी मागितली आहे का, त्यांच्या अपयशाबद्दल त्यांनी माफी मागायला हवी. काल ज्या मुलीवर अत्याचार झाले, त्या मुलीची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल. तिच्या खात्यात फडणवीस १५०० रुपये टाकत असतील. त्या १५०० रुपयांच्या बदल्यात त्या बहिणीच्या मुलीवर अशाप्रकारचे अत्याचार आणि हत्या करण्याचा अधिकार तुम्ही कोणाला दिला आहे का, तिने आम्ही देतो त्या १५०० रुपयांच्या मोबदल्यात तोंड बंद करावं, अशी सरकारची अपेक्षा आहे का? अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

संजय राऊत पुढे म्हणाले कि महिला अत्याचाराची ही राज्यातील काही पहिलीच घटना नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून महिलांवरील अत्याचार, हत्या या घटना वाढल्या असून कायदा व सुव्यवस्थेचं वाटोळं झालं आहे. कारण ते गृहमंत्री म्हणून कर्तव्य पार पाडत नाहीत. मुख्यमंत्री टिवल्या-बावल्या करत, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू याठिकाणी प्रचार करत फिरतात. राज्याची अवस्था कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत गंभीर आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ तास राजकारणात अडकले आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

हे राज्य सामान्य माणसाला राहण्यालायक उरलेले नाही. सत्ता, पैशांची मस्ती या बळावर राज्य चाललं आहे. कायद्याचा धाक नसल्यामुळे नराधमांना अत्याचार करायची हिंमत येते. काल सरकारने नवले पूलावर नसरापूरच्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. जनतेने हे सरकार ताब्यात घेतले पाहिजे. या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आरोपी करायला हवे आणि राज्य सरकारवर खटला चालवून, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे, असा हल्लाबोल राऊतांनी फडणवीस सरकारवर चढवला.

Leave a Comment

अधिक वाचा