कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेदरम्यान तरुणीचा मृत्यू ; संतप्त नातेवाईकांची डॉक्टरवर कारवाईची मागणी

SHARE:

पुणे – कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान पोटात झालेल्या रक्तस्त्रावामुळे २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना दौंड तालुक्यातील केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली असून २७ एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली. रंजना बाबू केसकर असे मृत महिलेचे नाव आहे. यांनतर मृत महिलेच्या संतप्त नातेवाइकांनी आरोग्य केंद्रात गोंधळ घालता आणि निष्काळजीपणाचा आरोप करत जबाबादार डॉक्टरवर कारवाईची मागणी केली.

केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ एप्रिल रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. दरम्यान सकाळी नऊ वाजता रंजना केसकर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर पोटात रक्तस्त्राव सुरूच राहिल्याने डॉ. अनिल कदम यांनी टाके टाकून पुढील शस्त्रक्रियेसाठी नानगाव येथील आरोग्य केंद्राकडे रवाना केले.

रंजना केसकर यांचा रक्तदाब झपाट्याने कमी होत असल्याचे लक्षात येताच वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा लोखंडे यांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढे पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात जोरदार गोंधळ घालत संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. डॉ. अनिल कदम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून करण्यात आली. ही वैद्यकीय चूक नसून सरळसरळ जीवाशी खेळ असल्याची अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे इतकी गंभीर घटना घडूनही यवत पोलीस ठाण्यात अद्याप अधिकृत तक्रार दाखल नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासन नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. एका तरुण आईचा जीव गेला, दोन लहान मुले पोरकी झाली. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, याला जबाबदार कोण? असा प्रश्न मृत महिलेचे कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

अशा घटना वारंवार घडत असतील तर आरोग्य व्यवस्थेवर लोकांचा विश्वास कसा राहणार? आरोग्य विभागाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच डॉ. अनिल कदम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकरी आणि कुटुुंबीयांनी केली आहे.

Leave a Comment