मंत्री अदिती तटकरेंच्या खासगी सचिवांवर गंभीर आरोप; महिला अधिकाऱ्यांशी असभ्य वर्तन अन् बदल्यांचे ‘रॅकेट’ चालवल्याचा ठपका!

SHARE:

मुंबई – राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलणे बदल्यांचे रॅकेट चालवणे आणि अधिकार्यांना धमकावण्याचे आरोप राजेश गायकवाड यांच्यावर लावण्यात आले आहेत. यामुळे मंत्रालयीन वर्तुळात खळबळ माजली असून, स्वतः अदिती तटकरेही यामु्ळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, महिला व बाल विकास विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेने मंत्री अदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की राजेश गायकवाड यांच्या गैरवर्तनाबाबत नमूद मुद्दे अत्यंत गंभीर व वस्तुस्थितीदर्शक आहेत. या प्रकरणी तात्काळ दखल घेणे अत्यंत निकडीचे आहे. तसे न झाल्यास अनेक अधिकारी यांची व्यावसायिक हानी व जीवितास गंभीर धोका होईल अशी शक्यता आहे.

संघटनेने आरोप केला आहे की राजेश गायकवाड यांची महिलांप्रति असलेली वृत्ती असंवेदनशील, असंस्कृत आणि संकुचित होती. तक्रारीत असेही म्हटले आहे की अनेक अधिकारी गप्प राहिले कारण त्यांना भीती होती की विरोध केल्यास त्यांच्या कारकिर्दीला धक्का बसेल. काही अधिकाऱ्यांना खोटे आरोप आणि बदनामीच्या धमक्याही देण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे बदल्या आणि प्रतिनियुक्तीशी संबंधित आरोप.

अधिकारी संघटनेने दावा केला आहे की, विभागांतर्गत नेमणुका आणि बदल्यांसाठी एक समांतर प्रणाली स्थापन करण्यात आली. जे अधिकारी कथित निर्देश किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये सामील नव्हते, त्यांना गैरसोयीच्या ठिकाणी पाठवण्यात आले. काही अधिकाऱ्यांप्रति पक्षपाताचेही आरोप आहेत. तक्रारीत असाही दावा करण्यात आला आहे की काही बाहेरील व्यक्ती आणि विभागीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार केले जात होते.

या प्रकरणावरून शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या एक्स हँडलवर केलेल्या द्वीटमध्ये म्हटले आहे कि राजेश गायकवाड यांच्याविरोधात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. जळगाव जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी देखील गायकवाड यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये महिला अधिकाऱ्यांशी अपमानास्पद, उद्धट आणि अश्लील भाषेत संवाद साधणे. महिला अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या देणे, मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रॅकेट चालवणे, असे आरोप केले आहेत.

महिला आणि बालविकास सारख्या संवेदनशील विभागात महिला अधिकाऱ्यांसोबत असा प्रकार घडणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे खडसे यांनी म्हटले. गायकवाड हे 2019 पासून या विभागात खासगी सचिव म्हणून कार्यरत असून, त्यांच्याविरोधात पूर्वीही अनेक महिलांनी तक्रारी केल्या होत्या. इतक्या गंभीर तक्रारी समोर येऊनही मंत्री तटकरे यांनी गायकवाड यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई का केली नाही? गायकवाड यांना मंत्री महोदयांचा वरदहस्त आहे का? त्यांच्यात काही आर्थिक लागेबांधे आहेत का? या प्रश्नांची उत्तरे राज्यातील जनतेला मिळाली पाहिजेत, असेही रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment