वारंवार पॅरोल! बलात्कार प्रकरणातील दोषी राम रहीम पुन्हा ३० दिवसांसाठी बाहेर…

SHARE:

नवी दिल्ली – बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपी गुरमीत राम रहीम याची पुन्हा एकदा तुरुंगातून सुटका झाली आहे. सोमवारी त्याला 30 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला. 2020 पासून राम रहीमला तात्पुरती सुटका मिळण्याची ही 16 वी वेळ आहे. गुरमीत राम रहीम आपल्या शिक्षेचे 3,193 दिवस पूर्ण केले असले तरी आश्चर्याची बाब म्हणजे त्याने 3,193 दिवसांपैकी 406 दिवस तुरुंगाबाहेर काढले आहे.

राम रहीम सध्या हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगात आहे. हरियाणा सरकारने राम रहीमला यावेळी 30 दिवसांसाठी पॅरोल मंजूर केला आहे. राम रहीम आज सकाळी साडेसहा वाजता तुरुंगातून बाहेर पडला. सुटकेनंतर, राम रहीम पंजाब आणि हरियाणा पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत सिरसा येथील डेरा सच्चा सौदा आश्रमाकडे रवाना झाला, जिथे तो त्याच्या पॅरोलच्या कालावधीपर्यंत राहणार आहे.

टीओआयच्या वृत्तानुसार, राज्य सरकारने गुरमीत राम रहीम याला पॅरोलवर सोडण्याची ही या वर्षातील दुसरी वेळ आहे. यापूर्वी, जानेवारी महिन्यात सरकारने त्याला 40 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. विशेष म्हणजे, मंगळवारी 30 दिवसांच्या पॅरोलवर सुटका झाल्यामुळे डेरा प्रमुखाचा या वर्षातील संपूर्ण पॅरोल कालावधी संपला असून, त्याच्याकडे केवळ 21 दिवसांची फर्लोची रजा शिल्लक राहिली आहे. कारागृहाच्या नियमांनुसार, एका कैद्याला एका कॅलेंडर वर्षात 70 दिवसांचा पॅरोल आणि 21 दिवसांची फर्लोची रजा मिळते. अनेक घटकांचा अभ्यास करून राज्य सरकार आपल्या विवेकबुद्धीनुसार या सुविधा मंजूर करते.

गुरमीत राम रहीम सिंग 2017 पासून रोहतकच्या सुनारिया तुरुंगात कैद आहे. दोन साध्वींवर बलात्कार केल्याबद्दल त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणातही त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

गुरमीत राम रहीम याला बहुतेकदा राज्य किंवा इतर निवडणुकांदरम्यान पॅरोल आणि फर्लो मंजूर करण्यात आले आहेत. हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक मतदारसंघांमध्ये डेराचे मोठ्या संख्येने भक्त आहेत. राम रहीम याला वारंवार पॅरोल आणि फर्लो दिल्याबद्दल विरोधी पक्ष आणि अनेक सामाजिक संघटनांनी हरियाणा सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राम रहीमच्या बाबतीत सौम्य भूमिका घेतल्याचा आरोपही सरकारवर करण्यात आला आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment