इंधन दरवाढीचा पालकांना मोठा फटका; स्कूल बसचे भाडे २०-२५ टक्क्यांनी महागले!

SHARE:

अमरावती – केंद्र सरकारने केवळ 10 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली. या दरवाढीचे संकट आता केवळ वाहतूकदारांपुरते मर्यादित राहिले नसून ते थेट विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या खिशापर्यंत पोहोचले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने होणार्या दरवाढीमुळे अमरावतीत स्कूल बस आणि व्हॅनच्या मासिक शुल्कात 25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवास महाग होणार असून आता पालकांना आपला खिसा आणखी खाली करावा लागणार आहे.

2026 नव्या शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढ होत आहे. या दरवाढीमुळे स्कूल बस आणि व्हॅनच्या मासिक शुल्कात तब्बल 25 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय अमरावती स्कूल बस-व्हॅन चालक-मालक वाहतूक संघटनेने घेतला आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या 800 हून अधिक स्कूल बस आणि व्हॅन कार्यरत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी दररोज या वाहनांद्वारे शाळेत ये-जा करतात. अनेक पालक नोकरी आणि व्यवसायामुळे मुलांना स्वतः शाळेत सोडू शकत नसल्याने स्कूल बसवर अवलंबून असतात. मात्र आता वाढलेल्या शुल्कामुळे पालकांना अधिकाचा भार सहन करावा लगाणार आहे.

वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल- डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. तसेच चालक आणि क्लिनर यांच्या वेतनातही वाढ करावी लागत असल्याने जुन्या शुल्कात सेवा देणे कठीण होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे अखेर मासिक शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा 1 जून 2026 तर महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळा 15 जून 2025 पासून सुरू होणार आहेत. यामुळे एकीकडे मुले नवीन शाळेत जाण्यासाठी उत्सुक आहेत, तर दुसरीकडे शाळा सुरू होताच येत्या शैक्षणिक वर्षात पालकांना स्कूल बससाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. तसेच अमरावतीनंतर ईतर जिल्हयांमध्ये देखील स्कूल बस आणि व्हॅनचे मालक किंवा त्यांच्या संघटना मासिक शुल्कात वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा