रुपाली चाकणकरांची भूमिका साकारल्यास करिअर उद्ध्वस्त करू; अभिनेत्री दिपाली सय्यद यांना जीवे मारण्याची धमकी!

SHARE:

मुंबई – संपूर्ण राज्याला हादरवून सोडणार्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर एक चित्रपट येत आहे. या चित्रपटात बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री दीपाली सय्यद या सिनेमात भूमिका साकारणार आहे. मात्र त्यांनी चित्रपटात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भूमिका करू नये अन्यथा करिअर उद्ध्वस्त करू, अशा फोनवरून धमक्या येत असल्याचा सनसनाटी दावा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या दाव्याने राज्यात खळबळ माजली आहे.

भोंदू अशोक खरात याने केलल्या काळ्या कृत्यांवर येत्या काही महिन्यात एक चित्रपट येणार आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ असं या चित्रपटाचं नाव असून स्वरूप बी सावंत हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. पुढच्या महिन्यात या चित्रपटाचं शुटिंग सुरू होणार असून ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात शिंदेसेनेच्या नेत्या आणि बिग बॉस फेम अभिनेत्री दीपाली सय्यद या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशीच्या फेर्यात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी चित्रपटात काम करू नये, अन्यथा करिअर उद्ध्वस्त करण्यात येईल, अशा धमक्यांचे फोन येत असल्याचा सनसनाटी दावा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपाली सय्यद यांनी सांगितले कि खरात प्रकरणावर चित्रपट येत असताना आणि रोल करत असताना कोणीही कलाकाराला दबावात आणू नये. मला यासाठी फोन आलेला आहे की तुम्ही या चित्रपटात काम करु नका. थोडसं थांबायला सांगत आहेत. अशी भूमिका करु नका. राजकीय दबाव आणतायेत. तुझं राजकीय करिअर उध्वस्त करु, असे मला काही धमक्यांचे फोन आले. असं फोन येणं पण चुकीचं आहे. मी अशा दबावाला भीक घालत नाही, हे माझं प्रोफेशन आहे आणि हे न करण्यासाठी जर मला फोन येत असतील तर मी या चित्रपटात काम करणारच, असं देखील सय्यद यांनी ठणकावून सांगितले.

मला तुम्ही फोन का करताय? राजकीय महिला नेत्या आहेत, त्यांचा रोल मी करते. मी या प्रेशरला घाबरत नाही आणि मी काम करणार आहे. या धमक्यांचे फोनबाबत मी माझ्या पक्षाच्या शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेंबांशी त्याचप्रमाणे मी श्रीकांत शिंदे साहेबांशी देखील याबाबत बोलणार आहे. त्यांच्यासमोर मी हे कोणाचे फोन आले, याचा खुलासा करणार आहे, असे सय्यद यांनी स्पष्ट केले. मी कलाकार आहे, कोणाची परमिशन घेऊन काम करत नाही. असेही त्या म्हणाल्या.

दोन-तीन दिवसांपूर्वीच या चित्रपटासंदर्भात चर्चा सुरू झाली. कालच मला महाराष्ट्र एफस्टीन फाईलची स्क्रिप्ट मिळाली. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला कळालं हे असं प्रकरण आहे. चार महिने मी बिग बॉसमध्ये होते, त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणात काय झालं? हे मला माहित नव्हतं, बाहेर आल्यानंतर कळलं आहे, असेही दिपाली यांनी म्हटलं.

मोठ मोठी लोक या प्रकरणामध्ये सहभागी आहेत आणि त्यामुळे अशी प्रकरण थांबली पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये असलेली एक लाईन आपल्याला माहिती असली पाहिजे. आपण किती लोकांवर श्रद्धा आणि अंधश्रद्धा ठेवली पाहिजे, हे लोकांना कळलं पाहिजे. मी कोणाशीही या रोल संदर्भात चर्चा करणार नाही. पुढच्या महिन्यात चित्रपटाचे शुटिंग झाल्यानंतर कुठला रोल मी करती हे तुम्हाला कळेलच, असे दिपीली सय्यद यांनी म्हटलं आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment