अल्पवयीन मुलगी आणि बाळाची विक्री; मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक

SHARE:

चंद्रपूर – अल्पवयीन मुलीसह बाळाचीही विक्री करणार्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. 4 जणांवर मानवी तस्करी, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूरात एका नराधम आईचे सत्य समोर आले आहे. पोलीसही चक्रावले आहेत.चंद्रपुरात स्वतःच्या पोटच्या मुलांची विक्री करणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोन मुलांची विक्री केल्यानंतर या महिलेने आपल्याच 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा कट रचला होता. याप्रकरणी चंद्रपूरातील रामनगर पोलिसांनी नराधम आईसह, नवजात बाळाची खरेदी करणार्या 2 महिलांना अटक केली आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अजय फुलझेले हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील 4 आरोपीवर मानवी तस्करी आणि पॉक्सो कायद्या अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर तिची ओळख अजय फुलझेले याच्याशी झाली. हे दोघेही त्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते.

मात्र, काही दिवसांतच नराधम अजय फुलझेलेची नजर त्या अल्पवयीन मुलीवर पडली. आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला होता. ज्यातून ती अल्पवयीन गरोदर राहिली. चंद्रपुरात या घटनेची माहिती होईल या भीतीने अजय फुलझेले आणि मुलीच्या आईने तिला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तिथे रुग्णालय प्रशासनाला संशय येऊ नये म्हणून, पूर परिस्थितीमध्ये आमची सर्व कागदपत्रे वाहून गेली अशी खोटी कथा रचून मुलीचे वय 20 वर्षे असल्याचे सांगितले.

मात्र, वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी नागपूरच्या अजनी पोलिसांकडे एमएनसी पाठवली. अजनी पोलिसांनी तातडीने झिरो एफआयआर नोंदवत हे प्रकरण पुढील तपासासाठी चंद्रपूर पोलिसांकडे पाठवले. या प्रकरणाचा तपास रामनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीचे सविस्तर जबाब घेतले, तेव्हा त्यांना यामागे काहीतरी मोठे रॅकेट असल्याचा संशय आला.

पोलिसांनी जेव्हा पीडित मुलीच्या आईला अटक केली. कडक चौकशी केली, तेव्हा तिने दिलेली कबुली ऐकून पोलिसही चक्रावून गेले. या आरोपी महिलेने यापूर्वी स्वतःचीच दोन मुले तेलंगणा आणि स्थानिक पातळीवर प्रत्येकी 2 लाख रुपयांना विकली होती. अल्पवयीन मुलीच्या पोटी जन्माला आलेल्या या नवजात बाळाचीही ती अशाच प्रकारे विक्री करणार होती.

या प्रकरणात रामनगर पोलिसांनी मानवी तस्करीचा गुन्हा दायाल केला आहे. पोलिसांनी बाळाची खरेदी करणाऱ्या एका महिलेला तेलंगणा राज्यातील कागजनगर येथून, तर दुसऱ्या महिलेला चंद्रपूर येथून अटक केली आहे. पोलीस आता फरार मुख्य आरोपी अजय फुलझेले चा शोध घेत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेचा अधिक तपास चंद्रपूर पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment