बँकेतच सुरक्षित नाही सोनं! ८० तोळे अस्सल सोन्याऐवजी बनावट दागिने ठेवून ग्राहकांची फसवणूक

SHARE:

नांदेड – देशातील सर्वात विश्वासार्ह मानल्या जाणार्या नांडेड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या एका शाखेतून ग्राहकांचा विश्वास डळमळीत करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील डाॅक्टर लेन शाखेत ग्राहकांनी तारण ठेवलेलं तब्बल 80 तोळे सोनं 18 मे रोजी बँक कर्मचार्यांनीच लंपास केल्याचं समोर आले आहे. इतकेच नाही तर हा प्रकार उघड होऊ नये म्हणून नकली सोनं ठेवण्यात आलं. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

कर्ज घेण्यासाठी ग्राहक तारण म्हणून सोनं बँकेकडे ठेवतात. परंतू आता बँकेतही ग्राहकांचं सोनं सुरक्षित नसल्याची एक घटना नांदेडमधून समोर आली आहे. येथील डाॅक्टर लेन शाखेत 8 ग्राहकांनी तारण म्हणून ठेवलेलं तब्बल 80 तोळे सोनं बँकेच्या कॅश इन्चार्ज आदित्य सेनगावकर आणि सर्विस मॅनेजर जीवन जगदाळे यांनी लंपास केल्याचं समोर आलं आहे. ही बाब माहित होऊ नये म्हणून त्यांनी बँकेच्या लाॅकरमध्ये खरे सोने काढून घेऊन 41 तोळे बनावट सोने ठेवले होते. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्विस मॅनेजर जीवन जगदाळे याला अटक करण्यात आली तर कॅश इन्चार्ज आदित्य सेनगावकर हा फरार झाला आहे.

धक्कादायक म्हणजे आदित्य सेनगावकर आणि जीवन जगदाळे यांनी लंपास केलेलं काही सोनं विकलं तर काही सोनं शहरातील वेगवेगळ्या बँकेत तारण ठेवून लाखो रुपयांचं कर्ज घेतलं आणि तो पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला. शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यानं अधिकार्यांनी हा प्रकार उघड होऊ नये म्हणून एक शक्कल लढवली आणि खोटं सोनं लाॅकरमध्ये ठेवलं. बँकेच्या अधिकार्यांनी ऑडिट केल्यानंतर हा प्रकार उघडकीस झाला.

याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक राजीव कदम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर वजीराबाद पोलिसांनी जीवन जगदाळे याला अटक केली. मात्र प्रकरण उघड होण्यापूर्वीच आदित्य सेनगावकर फरार झाल्याची माहिती आहे. रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बँक अधिकार्यांनी केलेल्या या कारणाम्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली असून बँकेतही ग्राहकांचं सोनं सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा