इंजिनिअरची हत्या पत्नीनेच घडवली; भाऊ आणि प्रियकराच्या साथीने केला काटा काढण्याचा कट

SHARE:

कराड – इंजिनियर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. पत्नीनेच भाऊ व प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही हत्या पत्नीनेच घडवून आणल्याचे तपासात उघड झाले आहे. काही दिवसापुर्वी सातारा जिल्ह्याच्या कराड शहरात एक हत्येची घटना घडली होती. ठाण्याच्या शहापूर येतील जलसंधारण विभागात कार्यरत असलेले सरकारी अभियंते लक्ष्मण श्रीरंग मंडले यांची कारने चिरडून हत्या केली होती. सुरुवातीला हा अपघात असावा, असे वाटले.

मात्र घातपाताचा संशय आल्याने कराड पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली, सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तपासात हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले आहे. शिवाय ही हत्या पत्नीनेच घडवून आणल्याचे समोर आले आहे. आरोपी पत्नी सारिका मंडले हिने आपला भाऊ आणि प्रियकराच्या मदतीनेच पतीचा हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सारिका हिचे वयाने 11 वर्षे लहान असणाऱ्या एका तरुणावर प्रेम होते.

दोघांमध्ये मागील 3 वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू होते. तसेच तिला पती लक्ष्मण मंडले यांच्याकडूनही त्रास होत होता. त्यामुळे सारिका मंडलेने आपल्या प्रियकराला 3 लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. कराड पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पत्नी सारिका मंडले, तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना घटनेच्या दिवशीच अटक केली होती. यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा कराड पोलिसांनी सरकारी अभियंते लक्ष्मण श्रीरंग मंडले यांच्या हत्येत प्रत्यक्ष सामील असलेला सारिकाचा प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश होनसुरे यांना अटक केली आहे.

या 4 जणांची पोलिस चौकशी सुरू आहे. मृत अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले वय 54 हे जलसंधारण विभागात कार्यरत होते. त्यांची नियुक्ती ठाणे जिल्ह्याच्या शहापूर येथे होती. 5 जून 2026च्या रात्री लक्ष्मण मंडले हे ठाण्याहून कराडकडे येत होते. त्यांनी याबाबतची माहिती आपल्या पत्नीला फोनवरून दिली होती. तसेच पहाटे आपल्याला न्यायला ये, असेही त्यांनी पत्नीला सांगितले होते. मात्र 6 जून 2026 रोजी पहाटेच्या वेळी जेव्हा ते कराडमधील कोल्हापूर नाका परिसरात गाडीतून उतरून पायी घरी निघाले होते, त्याच वेळी आरोपींनी त्यांना पाठिमागून कारने जोराची धडक दिली.

आरोपींनी 3 वेळा कार मागेपुढे करून त्यांना कारने चिरडून हत्या केली आणि तिथून फरार झाले. तपासात समोर आलेली माहिती जाणून पोलिसही चक्रावले आहेत. मृत लक्ष्मण मंडले यांची पत्नी सारिका मंडले आणि तिचा प्रियकर प्रथमेश थोरात यांचे 2023 पासून प्रेमसंबंध होते. कापड दुकानात काम करत असताना त्यांची ओळख झाली होती. पतीकडून मिळणाऱ्या त्रासाला कंटाळून आणि प्रियकरासोबत राहण्यासाठी सारिका मंडलेने पतीला मारायचे ठरवले. यासाठी तिने प्रियकर प्रथमेशला 3 लाख रुपये दिले होते. या प्रकरणात अधिक तपास कराड पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment