लग्नाच्या तगाद्याला कंटाळून तरुणीची हत्या; पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह जाळला

SHARE:

पनवेल – लग्नाच्या आग्रहाला कंटाळून तरुणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. तर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवल्याचे उघड झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एक हत्याकांड पनवेल तालुका पोलिसांनी समोर आणले आहे. प्रेयसीच्या लग्नाच्या आग्रहाला कंटाळून एका 27 वर्षीय तरुणाने तिची हत्या करून मृतदेह जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

11 एप्रिल 2026 रोजी मुंबईतील पनवेल तालुका परिसरातील चिंचवली-वाकडी गावाच्या हद्दीतील वनक्षेत्रात एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला होता.
मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. घटनास्थळी कोणतेही ओळखपत्र किंवा महत्त्वाचा पुरावा सापडला नव्हता. पोलिस तपासात सीसीटीव्ही फुटेज, बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी आणि तांत्रिक माहितीची पडताळणी केली. त्यातून मृत महिलेची ओळख पटली आहे. मुंब्रा-दिवा परिसरातील 30 वर्षीय अनितादेवी भगवान राजभर असे मृत महिलेचे नाव आहे.तिच्याजवळ सापडलेली अंगठी, नथ, कानातील दागिने आणि मनगटावरील दोरा हे ओळख पटविण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत.

पनवेल पोलिसांच्या तपासात अनितादेवीचा सतत संपर्क करण नामदेव पाटील या तरुणाशी असल्याली माहिती समोर आली आहे. पनवेल पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून तो हजर न राहिल्याने पोलिसांचा संशय अधिक वाढला होता. मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे पनवेल पोलिसांनी त्याचा शोध घेत अटक केली आहे. पनवेल पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी करण नामदेव पाटील आणि मृत महिला अनितादेवी भगवान राजभर यांच्यात प्रेमसंबंध होते.

मात्र, महिला लग्नासाठी सातत्याने आग्रह धरत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते. या नात्यातून सुटका मिळवण्यासाठी आरोपीने कट रचून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 6 एप्रिल 2026 रोजी आरोपीने महिलेला आपल्या होंडा सिटी कारमध्ये बसवून एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे लोखंडी सळीने तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली.

त्यानंतर मृतदेह जंगल परिसरात नेऊन पेट्रोल ओतले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवून दिला, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून उघउ झाली आहे. याप्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पनवेल पोलीस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment