विशेष – जगात रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते, कारण ते पैशाने विकत घेता येत नाही. एका व्यक्तीने केलेल्या रक्तदानाने तब्बल तीन व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. याच निस्वार्थ आणि दयाळू भावनेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १४ जून रोजी ‘जागतिक रक्तदाता दिन’ (World Blood Donor Day) साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील त्या कोट्यवधी लोकांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो, जे स्वेच्छेने आणि विनामोबदला रक्तदान करून माणुसकीचे खरे दर्शन घडवितात .जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization – WHO) नवीन आणि नियमित रक्तदात्यांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
जागतिक रक्तदाता दिनाची स्थापना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आणि तो पहिल्यांदा २००४ मध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर, २००५ मध्ये ५८ व्या जागतिक आरोग्य संमेलनात या दिवसाला अधिकृतपणे जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.हा दिवस साजरा करण्यासाठी १४ जून ही तारीख निवडण्यामागे एक महत्वपूर्ण कारण आहे. याच दिवशी १८६८ मध्ये ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ डॉ. कार्ल लँडस्टाईनर यांचा जन्म झाला होता. त्यांना आधुनिक रक्त संक्रमणाचे जनक मानले जाते. त्यांनीच रक्तगट प्रणालीचा शोध लावला, ज्यामुळे रक्त संक्रमण अधिक सुरक्षित झाले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळे आज लाखो लोकांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे .
जागतिक रक्तदाता दिन हा केवळ रक्तदात्यांचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर समाजात रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण करण्याचाही एक महत्त्वाचा मंच आहे .रक्तदान केल्याने केवळ इतरांचेच प्राण वाचत नाहीत, तर रक्तदात्याच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे.आपत्कालीन परिस्थिती, विविध मोठ्या शस्त्रक्रिया, कर्करोगाचे उपचार तथा प्रसूतीदरम्यान रक्तदान
महत्त्वपूर्ण ठरते.नियमित रक्तदान केल्याने शरीरातील अतिरिक्त लोहाचे प्रमाण नियंत्रणात राहते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.काही संशोधनांनुसार, नियमित रक्तदान केल्याने काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
रक्तदान केल्यानंतर शरीर नवीन रक्तपेशी तयार करते, ज्यामुळे शरीर ताजेतवाने आणि निरोगी राहते. रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्याची एक छोटी आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये रक्तदाब, हिमोग्लोबिन आणि इतर काही गोष्टी तपासल्या जातात. यातून आपल्याला आपल्या आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती मिळते.
आजकालच्या तरुण पिढीमध्ये रक्तदानाबद्दल जागरूकता वाढताना दिसत आहे. तरुण वर्ग याला केवळ एक मानवतावादी कार्य म्हणून नाही, तर सामाजिक जबाबदारी आणि वैयक्तिक आरोग्यासाठी एक चांगली सवय म्हणून बघतात .रक्तदान हे एक असे महान कार्य आहे, ज्यात आपण कोणालातरी जीवनाची सर्वात मोठी भेट देतो.जागतिक रक्तदाता दिनी आपण सर्वजण रक्तदान करण्याचा संकल्प करू या आणि ‘रक्त द्या, जीवनदान द्या’ हा संदेश कृतीत आणू या.
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले
महानुभाव ग्रंथोत्तेजक साहित्य अलंकार पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अमरावती.
संपर्क – ८०८७७४९६०९
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.





