सत्यशोधकीय विचारांचा समर्थ साक्षीदार असलेल्या मासिक वऱ्हाड विकासच्या दि.२ जुलै २०२६ रोजी असलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
वऱ्हाड विकास। वर्धापन दिन।
वाढविला मान। लेखनीचा ॥
वऱ्हाड विकासच्या नावाप्रमाणेच मागील ३८ वर्षापासून समाज प्रबोधनाच्या कार्यात वऱ्हाड विकासाने विकास केलेला आहे; म्हणूनच २ जुलैला फुले-शाहू- आंबेडकरांच्या सत्यशोधकीय परिवर्तनवादी विचारांचा समर्थ साक्षीदार ठरलेल्या मासिक वऱ्हाड विकासचा आज ३९ वा वर्धापन दिन आहे. हा क्षण म्हणजे वऱ्हाड विकासच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणीच होय. वऱ्हाड विकासचे संपादक समाजभूषण सत्यशोधक प्रा. श्रीकृष्ण बनसोड सन १९७५ पासून समाजप्रबोधात्मक लेखन करू लागले. त्यांचे पुरोगामी विचारांचे लेखन विविध वृत्तपत्रात प्रकाशित होऊ लागले. त्याच दरम्यान त्यांनी वैचारिक चळवळही सुरू केली.
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील समता सैनिक म्हणून ते कार्यरत आहेत. सन १९८५ मध्ये त्यांच्या मनात एक विचार आला की, आपल्या साप्ताहिकातून समाजापर्यंत समाजप्रबोधनात्मक विचाराची चळवळ पोहोचविली तर आपल्या कार्याला अधिक बळकटी येईल, असे विचार त्यांच्या मनात असतानाच स्व.अँड. ज. सि. अकर्ते (दादासाहेब) यांची भेट झाली. ते राज्यसभा सदस्य होते. त्यावेळी वऱ्हाड या नावाला एक वेगळेच महत्त्व आले होते. प्रा. बनसोड यांनी नवीन साप्ताहिकासाठी ‘वऱ्हाड विकास’ हे शीर्षक पाठविले. अँड. ज. सि. अकर्ते नेहमी दिल्लीला जात असत. दिल्लीच्या प्रसिद्धी कार्यालयातील अधिकाऱ्यांना ‘वऱ्हाड’ शब्दाचा अर्थबोध होत नव्हता अँड. अकर्ते यांनी स्वतः ‘वऱ्हाड विकास’ हे शीर्षक मान्य करून आणले आणि प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी दि.१ जुलै १९८७ ला वऱ्हाड विकास साप्ताहिक सुरू केले. वऱ्हाड विकासचा अंक आकोटचे स्व. भाऊसाहेब गणगणे यांच्या वाचण्यात आला होता, त्यांना तो खूप आवडला. संपादक प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांना त्यांनी स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले. भोजन झाल्यावर ५००/- रुपये प्रा. बनसोड यांना दिले आणि पेपर छापण्यासाठी राहू द्या असे म्हणाले. प्रा. बनसोड यांना त्या ५००/- रुपयापासून मिळालेले प्रोत्साहन त्यांच्या कार्याला उर्जा देते असे ते म्हणतात, आजही त्यात व गणगणे यांच्या वृत्तपत्रीय दूरदृष्टीला आणि सामाजिक जाणिवेतून केलेल्या मदतीला प्रा. बनसोड अजूनही विसरले नाहीत. प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी फुले शाहू-आंबेडकरांचे सत्यशोधकीय परिवर्तनवादी पुरोगामी विचार सामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी वऱ्हाड विकासचा परिपूर्ण उपयोग केला.
सतत ३८ पासून वऱ्हाड विकास प्रकाशित करून हजारो वाचकांपर्यंत तो पाठवून,वाचन संस्कृती समृद्ध करण्याचा, सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला गतीशील करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ते सेवानिवृत्तीनंतर पेंशनच्या भरवशावर साप्ताहिकाच्या छपाईचा खर्च झेपणार नव्हता; म्हणून त्यांनी साप्ताहिकाचे रुपांतर १५ जुलै २००७ रोजी मासिकामध्ये करून फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून समाजप्रबोधन व समाज जनजागृतीचा प्रयास लेखनीतून सुरू आहे व पुढेही सतत सुरू राहणार असे ते म्हणतात. वऱ्हाड विकास या विचारपत्राच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, विधवा-निराधार भगिनींना मदत, कर्तृत्ववान ज्येष्ठ मातांचा सत्कार, सरपंच-उपसरपंच, पोलीस पाटील यांचा सत्कार, समाजाला प्रेरणास्त्रोत ठरलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, ‘मी प्रशासकीय अधिकारी होणारच’ या अंतर्गत बहुजन समाजातील दहावी -बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांना ‘ स्पर्धा परीक्षेविषयी मोफत मार्गदर्शन, कोरोना संक्रमण काळात असंघटीत घरेलू महिला कामगारांना जीवनावश्यक वस्तूंची मदत, शेतमजुरांच्या लग्नाळू मुलींच्या विवाहासाठी मदतीचा हात देण्यासाठी वऱ्हाड विकासच्या माध्मातून प्रा. श्रीकृष्ण बनसोड सदैव तत्पर असतात. ते अनेक कवी आणि लेखक यांच्या विचारांना समाजापर्यंत पोहचविणारे प्रभावी माध्यम आहे.
अखिल भारतीय माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अँड. संभाजीराव पगारे, धुळे यांच्या मते, “वऱ्हाड विकास” हे विचारपत्र आहे. सामाजिक परिवर्तनाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य करीत आहेत. अमरावतीच्या महात्मा फुले बँकेचे माजी अध्यक्ष व वऱ्हाड विकासचे वाचक मा. राजेंद्र आंडे यांच्या मते, वऱ्हाड विकास बहुजन समाजाला वैज्ञानिक व पुरोगामी विचारधारा आणि दृष्टी देण्यात यशस्वी ठरलेले आहे. सामाजिक प्रबोधन व सामाजिक परिवर्तनाचा वसा घेतल्यामुळे आपले वेगळे अस्तित्व व प्रभाव जनमानसाच्या मनावर वऱ्हाड विकासने कोरला आहे.संपादक प्रा.बनसोड यांच्या या कार्याला माझा सलाम ॥
असा हा सत्यशोधकीय परिवर्तनवादी विचारांचा साथीदार असलेल्या ‘वऱ्हाड विकास’ या मासिकाच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त संपादक प्रा. श्रीकृष्ण बनसोड, प्रबंध संपादक डॉ. प्रवीण बनसोड आणि संपादक मंडळाला शुभेच्छा देतो व पुढेही त्यांचे हे मासिक अखंड सुरू राहण्यासाठी सत्यशोधक प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांना उदंड आयुष्य लाभो ही शुभकामना व्यक्त करतो.
लेखक –
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले
महात्मा फुले राज्यस्तरीय
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
साहित्यिक, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत.






