भारत हा जलसंपन्न देश असूनही राज्यांमध्ये पाणी वाटप हा नेहमीच वादग्रस्त विषय ठरत आलेला आहे. पाणी हा फक्त नैसर्गिक संसाधन नाही, तर तो राज्यांमधील राजकारणाचा मुख्य घटक बनला आहे. गोदावरी, कृष्णा, तापी, कावेरी यांसारख्या नद्यांवर वारंवार राज्यांमध्ये वाद निर्माण होतात. या संघर्षामागे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलाशी संबंधित अनेक कारणं आहेत.
पाण्यावरील वाद –
भारतामधील अनेक नद्या अनेक राज्यांमधून वाहतात. उदाहरणार्थ, गोदावरी नदी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांतून जाते. त्यावर सिंचन प्रकल्प, धरणं, जलविद्युत प्रकल्प यांच्या माध्यमातून राज्यांना पाणी हवे असते. यामुळे वाटपावर तणाव निर्माण होतो. त्याचप्रमाणे कावेरी नदीवर तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये दीर्घकालीन वाद आहेत. या संघर्षामुळे शेतकरी, नागरिक, उद्योग यावर परिणाम होतो. राज्यांमधील हे वाद फक्त पाण्याच्या वाटपावरच नाही, तर धरणांच्या विसर्ग, सिंचन प्रकल्पांच्या योजनांवरही असतात. जलसंपत्तीच्या कमी पडण्यामुळे नद्या नैसर्गिक मार्गावरून वाहू शकत नाहीत. परिणामी काही राज्यांमध्ये अतिवृष्टीचे पाणी शेकडो किलोमीटर दूर जाताना अडथळा येतो आणि काही राज्यांमध्ये दुष्काळ निर्माण होतो.
धोरणात्मक दृष्टिकोन –
राज्यातील पाणी वादांना मध्यस्थ म्हणून केंद्र सरकार आणि जल आयोग पुढे येतात. पण अनेक वेळा केंद्र सरकारच्या धोरणामुळेही राज्यांमध्ये तणाव वाढतो. जल आयोगाचे निर्णय काही राज्यांसाठी न्याय्य वाटत नाहीत, ज्यामुळे स्थानिक राजकारण तापलेले असते. राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प जसे जलजिवन मिशन, नदी पुनरुज्जीवन, धरणांचे नूतनीकरण यांचा परिणाम काही प्रमाणात होतो, पण त्यासाठी राज्यांमधील समन्वय आवश्यक आहे. अनेकदा या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत विलंब किंवा राजकीय विवादामुळे धोरणांचा परिणाम तात्काळ दिसत नाही. तसेच गेल्या दशकभरात हवामान बदलामुळे पाण्याचे स्वरूपही बदलले आहे. अतिवृष्टी, मुसळधार पाऊस, हिमनदी वितळणे, अति कोरडेपणा या घटनांमुळे पाण्याची उपलब्धता अनिश्चित झाली आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा किंवा विदर्भसारख्या प्रदेशात मुसळधार पाऊस अचानक पडल्यास जलस्रोत ओसंडून वाहतात, तर काही राज्यांमध्ये पाणी मिळणे अवघड होते. लोकसंख्या वाढ, शहरीकरण आणि जलसंधारणाचा अभाव या सर्व कारणांमुळे राज्यांमधील पाण्याचा तणाव वाढतो. नद्या शेवटी राज्यांच्या हद्दीतून वाहताना त्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होतो. परिणामी धोरणात्मक दृष्टिकोनाशिवाय या समस्येचे दीर्घकालीन समाधान कठीण आहे. पाण्याचे व्यवस्थापन फक्त धोरणात्मक मुद्दा नसून सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात जलसखी प्रकल्प आणि ग्रामपंचायत पातळीवरील महिला नेतृत्व या समस्येच्या उपाययोजनेत मोठा वाटा उचलतात. महिला स्थानिक पातळीवर जलस्रोतांचे व्यवस्थापन, नळपाणी पुरवठा, शेतातील सिंचन आणि पाण्याचा सुयोग्य वापर सुनिश्चित करतात. महिला नेतृत्वामुळे पाण्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होते. हे नेतृत्व केवळ पर्यावरणीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर राज्यांमधील संघर्ष कमी करण्याच्या धोरणात्मक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे ठरते.
समन्वय –
पाण्याच्या वाटपावर होणाऱ्या संघर्षामुळे शेतकरी आणि नागरिकांवर थेट परिणाम होतो. शेतजमिनीतील पिके पाणी न मिळाल्याने नष्ट होतात. उद्योगांना पाण्याची कमतरता भासते, ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. शहरी भागात पाण्याचा तुटवडा, वाहतूक ठप्प होणे, आजार पसरणे हे काही दुष्परिणाम आहेत. राज्यांमधले वाद स्थानिक प्रशासनासमोरही मोठे आव्हान निर्माण करतात. वाद शांत करण्यासाठी तात्काळ मदत पुरवणे आवश्यक असते, पण दीर्घकालीन उपायाशिवाय हा संघर्ष सतत सुरू राहतो. खरंतर पूर आणि दुष्काळ टाळण्यासाठी काही ठोस उपाय करणे गरजेचे आहे. जसे की, जलसंधारण प्रकल्प. त्या अंतर्गत छोटे बांध, शेततळे, जलसाठा वाढवणे आवश्यक आहे. नदीपात्र मोकळे करणे हा देखील एक पर्याय आहे. अतिक्रमण हटवणे, नदीचे नैसर्गिक प्रवाह राखणे याचा समावेश यात होतो. अर्ली वॉर्निंग सिस्टम तयार करून पावसाच्या अलर्टसाठी आधुनिक साधने आणि मोबाईल सूचना तयार केल्या पाहिजे. धरण व्यवस्थापन अंतर्गत विसर्गाचे नियोजन, राज्यांमधील समन्वय वाढवला पाहिजे. जंगल व झाडी पुनरुज्जीवन झाले पाहिजे. या उपाययोजनांमुळे फक्त नैसर्गिक आपत्ती टाळली जाऊ शकत नाही, तर राज्यांमधील राजकीय तणावही कमी होऊ शकतो.
आधारस्तंभ –
मराठवाडा, विदर्भ आणि अन्य राज्यांमध्ये पाणी संकट वाढत चालले आहे. नद्यांवरील संघर्ष हे फक्त राज्यांमधले राजकारण नाही, तर राष्ट्रीय सुरक्षा, विकास आणि सामाजिक स्थैर्याचा मुद्दा आहे. जलसंपत्तीचे व्यवस्थापन केवळ पर्यावरणीय नव्हे, तर धोरणात्मक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे ठरते. पाणी धोरणाबाबत दीर्घकालीन, विज्ञानाधारित आणि समन्वयात्मक उपाय आवश्यक आहेत. केंद्र आणि राज्यांनी एकत्र येऊन प्रत्येक नदी, धरण आणि जलस्रोताची नीट पाहणी करणे गरजेचे आहे. जर योग्य पावले उचलली गेली, तर पाणी हा संसाधन न राहता भारतासाठी सुरक्षित भविष्यातील आधारस्तंभ बनू शकतो.
Author: तेजस्वी बारब्दे पाटील
लेखिका अमरावती येथील रहिवासी असून सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या तथा विश्लेषक आहेत. एक स्तंभलेखक म्हणून त्यांनी स्वतः ची नवीन ओडख निर्माण केली आहे.






