आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणात केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सोहळा; ‘भारत टॅक्सी’ (BHARAT TAXI) सेवेचा थाटात शुभारंभ…

SHARE:

नवी मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणात केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सोहळ्यात ‘भारत टॅक्सी’ (BHARAT TAXI) सेवेचा शुभारंभ झाला. सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’ प्रवासी आणि चालकांसाठी नवा अध्याय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू झालेली ही संकल्पना प्रवाशांना रास्त भाड्यात सुरक्षित प्रवास देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

भारत टॅक्सीच्या माध्यमातून एक अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि स्वस्त पर्याय उभा राहिला आहे. एकाच मोबाईल ॲपद्वारे कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी अशा तिन्ही प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मध्यस्थांची साखळी मोडीत काढून थेट चालक आणि प्रवाशाला जोडणारी ही क्रांती ठरेल. पहिल्या दीड किलोमीटरसाठी केवळ ३१ रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर २१ रुपये असा काळी-पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर निश्चित केलेला सुटसुटीत दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे. या नव्या वाहतूक व्यवस्थेमुळे या भागातील भूमिपुत्र आणि तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. डिजिटल स्वाक्षरीसह राज्य सरकारने ॲग्रीगेटर धोरणाची चौकट आखून दिली असून, संपूर्ण आर्थिक व्यवहारांवर सहकार विभागाचे नियंत्रण असणार आहे. पहिल्या टप्प्यात ६०० टॅक्सींचे अनावरण करण्यात आले असून आगामी काळात १००० पेक्षा जास्त टॅक्सींचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आगामी काळात ही सेवा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवून प्रवाशांना अधिक सुरक्षित व सुखद अनुभव देण्याचा संकल्प आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘सहकार टॅक्सी’ संस्थेमुळे चालक आता कर्मचारी न राहता थेट सभासद व मालक बनले आहेत. संस्थेच्या नफ्याचा लाभांश (डिव्हिडंड) आता थेट चालकांच्या खात्यात जमा होणार आहे. देशभरातून सुमारे ८ लाख चालक या संस्थेशी जोडले गेले असून, अल्पावधीत ७७ कोटी रुपये कोणत्याही कमिशनशिवाय थेट चालकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. दिल्ली आणि गाझियाबादपाठोपाठ आज मुंबई महानगरात ही सेवा सुरू झाली असून, लवकरच पुणे आणि नागपूर येथेही तिचा विस्तार केला जाईल असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment